धुळे : एक हजार रुपयांची लाच मागणा-या मुख्याध्यापकाविरुद्ध त्याच शाळेतील शिक्षिकेने एसीबीकडे तक्रार केली. धुळे एसीबीच्या कारवाईत लाच मागणारा मुख्याध्यापक रंगेहाथ पकडला गेला आणी त्याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप पुंडलीक परदेशी असे या लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापक कक्षातच हा प्रकार घडल्याने स्थानिक शैक्षणीक क्षेत्रात खळबळ माजली आहे. सोशल अॅण्ड कल्चरल असोशिएशन संचलित आदर्श हायस्कुल, कुसुंबे ता. जि. धुळे येथे हा प्रकार घडला आहे.
तकारदार महिला शिक्षिका या उपशिक्षिका पदावर कार्यरत आहेत. या शाळेत आयोजीत करण्यात आलेल्या एका उपक्रमासाठी खर्च झाला होता. हा खर्च भरुन काढण्यासाठी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार आणि शिक्षकेतर कर्मचा-यांकडून प्रत्येकी आठशे रुपये जमा करण्याचा फंडा वापरला. सर्व शिक्षकांची आणि कर्मचा-यांची बैठक बोलावून त्यांना या निधी संकलनाची कल्पना देण्यात आली. मात्र तक्रारदार उप शिक्षिकेने या प्रकाराला विरोध केला.
एक हजार रुपये शिक्षिका देत नसल्यामुळे मुख्याध्यापक प्रदिप पुंडलीक परदेशी चिडले. जोपर्यंत तक्रारदार शिक्षिका एक हजार रुपये देत नाही तोपर्यंत त्यांना हजेरी रजिस्टरवर सही करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे या उप शिक्षिकेने मुख्याध्यापक परदेशी यांची धुळे एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची एसीबीने आपल्या पद्धतीने पडताळणी केली असता त्या तक्रारीत तथ्य आढळून आले. दरम्यान लाचेचा स्विकार करताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने मुख्याध्यापक परदेशी यांना त्यांच्याच दालनात रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंतिजसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.