जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी)- ‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात आपला महत्वपूर्ण सहभाग ठरतोच परंतु कार्बन क्रेडीटच्या रूपाने आर्थिक फायदा ही मिळवता येऊ शकतो यासाठी शेतकऱ्यांनी जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे..’ असे आवाहन जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन यांनी केले. जैन इरिगेशनचे हवामान स्मार्ट शेती आधारित हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि मातीत सेंद्रीय कार्बन सुधारणेसाठी प्रकल्पसाठी भागधारक परामर्श बैठकीत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी श्री सायन शुगर फॅक्टरी सायन सुरतचे चेअरमन राकेश पटेल, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. व्ही. दहात, स्मार्ट प्रोजेक्ट आत्मा सस्थेचे श्री जाधवर, श्रीकांत झांबरे, कापूस संशोधन केंद्राचे गिरीश चौधरी, क्लायमेट तज्ज्ञ आशिष सोनी, धर्मेश पटेल, जळगावचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, यशदाच्या सौ. कल्पना पाटील, शुभांगी भोळे (नाशिक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिवाय दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जगभरातील या क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग होता. जळगाव पंचक्रोशीतील शेतकरी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश मधील शेतकरी सहभागी झाले होते. जैन इरिगेशचे सहकारी अतिन त्यागी यांनी सकाळ व दुपार सत्रातील बैठकीत कार्बन क्रेडीट प्रोजेक्ट बद्दल सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. या बैठकीत मराठी, हिंदी, गुजराती, तेलगु व इंग्रजी इत्यादी भाषांतराची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत विकसित करीत आहे. स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांची या सभेला उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जनमेजय नेमाडे, डॉ. निर्मला झाला, डॉ. अनिल ढाके, डॉ. जयश्री राणे यांच्यासह जैन इरिगेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिश्यु कल्चर केळी लागवड कार्बन क्रेडीटसाठी मोलाची भूमिका – डॉ के. बी. पाटील
केळी तज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी केळी पिकामुळे कार्बन उत्सर्जन कसे कमी करते याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की; जैन टिश्युकल्चर तंत्रज्ञानाने गत ३० वर्षात साध्य केले आहे. पूर्वी २० ते २२ महिने केळीच्या पिकाला लागत होते त्यातून २५ टन प्रतिहेक्टर केळीचे उत्पादन होत होते. आज २० महिन्यात जैन टिश्युकल्चर केळीचे दोन पीक शेतकरी घेत आहेत त्यामुळे २० महिन्यात एका झाडापासून ५० किलो उत्पादन मिळत आहे. यासोबतच एका पिकातून एकरी १५० टन बायोमास म्हणजे दोन पिकातून ३०० टन बायोमास जमिनीत गाडला जातो त्यामुळे जमिनीचा ऑरगॅनीक कार्बन वाढतो त्याच सोबत पाण्याची ५६ टक्के ठिबक मुळे बचत होते. त्यामुळे विद्युत विजेची बचत झाली.त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले; तसेच १२.५ कोटी जैन टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड होत आहे त्यामुळे साधारण दरवर्षी ३३ हजार हेक्टर ग्रीन कव्हर निर्माण करीत आहे आणि वातावरण बदलावर मात करण्यासाठी काम करीत आहे. ‘लीव्ह धीस वर्ल्ड बेटर दॅन यू फाउंड इट’ या मिशन प्रमाणे सृष्टी सांभाळण्या साठी केळी पीक महत्त्वाची भूमिका बजावत आहे..
कार्बन क्रेडीट प्रकल्प शेतकरी आणि पर्यावरण ह्यांना लाभदायी– डाॅ. बी.डी. जडे
ठिबक सिंचन हे पिकांना पाणी देण्याचे अथवा सिंचनाचे साधन नसून पाणी वापरात बचत बरोबरच पिकांचे उत्पादन वाढीकरिता तसेच या तंत्रज्ञानामुळे विजेची ३३ टक्के बचत होते. तसेच रासायनिक खताच्या वापरामध्ये ही ३० टक्के बचत होते. जैन इरिगेशनच्या पुढाकारामुळे ऊस, कापूस या पिकांमध्ये ठिबक सिंचन तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सर्व पिकांमध्ये राज्यात कापूस पिकाकरिता ठिबक सिंचनाचा सर्वात अधिक वापर होत आहे. ऊस पिकाकरिता खूप पाणी लागते हा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. वनस्पती शास्त्रमध्ये ऊस हे पिक ‘सी-४’ वर्गात मोडते या पिकास अधिक पाण्यापेक्षा अधिक सूर्यप्रकाशाची गरज असते. म्हणून ऊसाच्या दोन ओळीत ५ ते ६ फूट अंतर ठेवावे. ऊसाकरिता ठिबक सिंचन वापर केल्याने उसाचे एकरी १०० टनाहून अधिक उत्पादन शेतकरी घेत आहे. जैन इरिगेशन आता ऊसाचे एकरी २०० टन घेण्याकरिता प्रयत्नशील आहे. ऊसामध्ये ठिबक तंत्राचा वापर केल्याने साखर उतारा सुद्धा वाढतो. त्यामुळे मोकळे पाणी देतांना अधिक जास्त वेळ पंप सुरु ठेवावा लागतो. त्यामुळे विजेचा वापर जास्त होतो ठिबक मुळे विजेची ३३ टक्के रासायनिक खताच्या वापरामध्ये ३० टक्के तसेच पाणी वापरामध्ये ५० ते ६० टक्के बचत होते. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साईट वातावरणात सोडण्याचे प्रमाण कमी होते, कार्बन क्रेडीट जास्त मिळतील त्यामुळे कार्बन क्रेडीट प्रकल्प शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाकरिता लाभदायी ठरणार आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन अतिन त्यागी यांनी तर सकाळ सत्राचे डॉ. नेमाडे यांनी व किशोर कुळकर्णी यांनी दुपार सत्राचे आभारप्रदर्शन केले.