जळगाव : सट्टापेढी चालकाने ठरलेली रक्कम वेळेवर दिली नाही, फोन उचलला नाही म्हणून त्याला उचलून आणत जबर मारहाण केल्याची घटना जनता जनार्दनाच्या चर्चेतून कुठे दबक्या आवाजात तर कुठे खुलेआम ऐकू येत आहे. तथापी या घटनेची शहानिशा स्वत: पोलिस अधिक्षकांनी करणे गरजेचे असल्याचे देखील जनतेत म्हटले जात आहे. कुठेतरी आग लागली म्हणून कुठून तरी धुर येत असल्याचेदेखील या निमित्ताने म्हटले जात आहे. पोलिस अधिक्षक या घटनेची पाळेमुळे खणून काढून संबंधित प्रभारींसह संबंधीत पोलिस कर्मीवर कारवाई करतील अशी अपेक्षा जनता बाळगून आहे.
याबाबत कानोसा घेतला असता एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एक सट्टापेढी चालते. या पेढीचा मालक धार्मिक उपवास सुरु असल्यामुळे नमाज पठण करण्याकामी गेला होता असे समजते. 15 मार्च शुक्रवारचा तो दिवस असल्याचे म्हटले जाते. त्यावेळी पेढीचालकाने संबंधित मासिक जमाकर्त्या कर्मचा-याचे फोन घेतले नाही असे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार पेढीचालकाला घटनास्थळावरुन उचलून आणत संबंधीत जमाकर्त्या पोलिसकर्मीने मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याला सायंकाळी सरकारी दवाखान्यात दाखल व्हावे लागले. त्यानंतर घटनाक्रम उघड होणार असे लक्षात येताच धावाधाव करुन हे प्रकरण मिटवण्यात आल्याचे अर्थात मॅनेज करण्यात आले असे म्हटले जात आहे. तथापी या प्रकरणाची शहानिशा वरिष्ठ पातळीवरुन होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.