जळगाव दि. ३० (प्रतिनिधी) – भारतातील विविध प्रांतात विहार करून आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचे १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी जैन हिल्स परिसरात होत आहे. आचार्यश्रींना भारत सरकारतर्फे पद्मभूषण या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. आपल्या ओघवत्या वाणीने लाखो जैन व जैनेत्तर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी ४५० पुस्तकांचे विपूल लेखन केलेले आहे. या संस्कारक्षम लेखन कार्याबद्दल त्यांची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे.
१ एप्रिल २०२४ रोजी जैन हिल्स येथे त्यांचा मंगल प्रवेश होणार असून त्यावेळी जैन ध्वजवंदन, ध्वजगान व पद्मभूषण सन्मानासाठी मानवंदना देण्यात येणार आहे. दरम्यान आगम वांचना या शिबिराचे आयोजन ५ ते ७ एप्रिल २०२४ या तीन दिवसात होईल. त्यांच्या दर्शनासाठी देशाच्या विविध प्रांतातून श्रद्धाळू भाविकांचे आगमन होण्याचे संकेत आहेत. आगम वांचना शिबिरात शेकडोंच्या संख्येने प्रशिक्षणार्थी सहभागी होतात. जैन हिल्सच्या गुरुदेवांच्या प्रवेशावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन इरिगेशनचे सिस्टिम्स् लि. चे अध्यक्ष व गुरुदेव स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.