प्रियकराच्या मदतीने पतीच्या खूनात पत्नी सहभागी

जळगाव : अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करुन विवाहीत प्रेयसीच्या पतीचा खून करणा-या प्रियकर महाराजासह महिलेस भडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. 31 मार्चच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

किशोर शिवाजी पाटील असे भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथील मयताचे नाव आहे. मयत किशोर पाटील याची पत्नी पुष्पा पाटील हिचे पुणे जिल्ह्याच्या खेड आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज याच्यासोबत प्रेमसंबंध पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रेमसंबंधात पुष्पा पाटील हिचा पती किशोर पाटील हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करुन त्याचा खून केल्याचे तपासात आढळून आले आहे. मयताची पत्नी पुष्पा किशोर पाटील हिला ताब्यात घेवुन तांत्रीक पुराव्याचा आधार घेण्यात आला. त्यानंतर या घटनेतील संशयीत आरोपी राजेंद्र गंगाधर शेळके (रा. खेड आळंदी पुणे) याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्यात वापरलेली चार चाकी गाडी (MH 12 FS 0010) मारोती सियाज ही देखील तपासकामी ताब्यात घेण्यात आली आहे.

दिनांक 31 मार्च 2024 च्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील पळासखेडा ते पारोळा तालुक्यातील तरवाडे या दोन गावांच्या दरम्यान भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील रस्त्यावर एक इसम मयत अवस्थेत आढळून आला होता. पळासखेडा येथील पोलिस पाटील यांनी याबाबतची माहिती भडगाव पोलिसांना दिली. याप्रकरणी सुरुवातीला दाखल अकस्मात मृत्यूचा तपास स.पो.नि. चंद्रसेन पालकर यांच्याकडे देण्यात आला. अकस्मात मृत्यूच्या तपासादरम्यान हा घातपाताचा प्रकार निष्पन्न झाला. मयत किशोर व त्याची पत्नी पुष्पा यांचे पैशांच्या देवाणघेवाणीवरुन वाद होत असत. तसेच मयत किशोर हा पुष्पा आणि राजेंद्र शेळके महाराज यांच्या प्रेमसंबंधात अडसर देखील ठरत  होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला.

लोकांचे उधार उसनवारीचे पैसे देण्यासाठी आळंदीचे राजेंद्र शेळके महाराज हे पैसे देण्यासाठी येणार असल्याचे किशोर यास खोटे सांगण्यात आले. पैसे मिळणार असल्याचे खरे वाटल्यामुळे किशोर हा राजेंद्र शेळके याच्या गाडीत बसला. त्याला रस्त्यात ठार करुन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिस तपासात हा बनाव उघडकीस आला. या घटनेतील दोघा संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, स. फौ. संजय काळे, स. फौ. रमण कंडारे, स. फौ. राजेंद्र पाटील चालक, स.फौ. अनिल रामचंद्र अहिरे, पोहेकों निलेश ब्राम्हणकार, पोकाँ भुषण शेलार, पोका भुषण मोरे, पोकाँ संदिप सोनवणे, पोका संभाजी पाटील (चालक) आदींनी या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला. या गुन्हाचा पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here