धुळे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीला हद्दपारीची भीती घालून त्याच्याकडून दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी व तिचा स्विकार केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह दोघा हवालदारांविरुद्ध एसीबीची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध दोंडाईचा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने राजकीय तसेच पोलिस दलात खळबळ माजली आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील अशी तिघांची नावे आहेत.
तकारदार हे दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे येथील रहिवाशी असुन ते राजकिय व सामाजिक चळवळीत सकिय आहेत. तकारदाराचे त्यांच्या राजकिय सहका-यांशी मतभेद झाल्याने राजकिय आकसाने त्यांच्याविरुध्द दोंडाईचा पोलिस स्टेशनला राजकिय गुन्हे दाखल झाले आहेत. या परिस्थितीचा फायदा उचलत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी त्यांची भेट घेतली. तुझ्यावर यापुर्वी दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती काढून तुझ्यावर गुन्हे नोंद करुन लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर पोलीस स्टेशन कडुन प्रस्ताव मागवला जाईल अशी तक्रारदाराला भिती दाखवण्यात आली. तुला जिल्हयातुन हददपार करणार असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दोन लाख रुपये द्यावे लागतील असेही त्या राजकीय तक्रारदाराला सांगण्यात आले.
याप्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबी कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली. एसीबीच्या पडताळणीअंती व तडजोडी अंती पो.नि. दत्तात्रय शिंदे यांनी दीड लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच देण्याघेण्याचे निश्चित झाले. लाचेची रक्कम पोलीस हवालदार नितीन मोहने याच्या हस्ते स्विकारतांना एसीबी पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. 1 एप्रिलच्या सायंकाळी दोंडाईचा धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळया जागेत पो. हवा. मोहने यांनी पंचासमक्ष स्वतः रक्कम स्वीकारली.
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी कारवाई केली आहे.