नाशिक : वावी पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा घरफोडी करणा-या सहा गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. विशेष बाब म्हणजे वावी पोलिस स्टेशनला घरफोडीची फिर्याद दाखल करणाऱ्या तरुणास अटक करण्यात आलेली महिला आरोपी ओळखते. याच ओळखीचा फायदा घेत ती फिर्यादी तरुणास शॉपिंग करण्यास घेऊन गेली होती. याच कालावधीत तिच्या साथीदारांनी त्याच्याकडे घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे.
मयुरेश निवृत्ती काळे (रा.पाथरे बु।।, ता. सिन्नर, जि. नाशिक) तरुणाच्या राहत्या घरी दुपारच्या वेळी बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात इसमांनी घरफोडी केली होती. या घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनेप्रकरणी वावी पोलीस स्टेशनला गुरनं 142/24 भादवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक ग्रामीण एलसीबी पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे सहकारी करत होते.
या गुन्हयाच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोकॉ विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या तसेच तांत्रिक तपासात सहा आरोपी निष्पन्न झाले. सुनिल शंकर म्हस्के (रा. साबरवाडी, ता. येवला, जि. नाशिक), चांगदेव भागीनाथ देवडे (रा. बदापुर, ता. येवला, जि. नाशिक), कैलास शिवाजी मावई (रा. चिचोंडी, ता. येवला, जि. नाशिक), अकरम कमरूद्दीन शेख (रा. विंचुर रोड, येवला, ता. येवला, जि. नाशिक), जीवन वाल्मीक कोल्हे (रा. हडप सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) आणि अलका दिपक जेजुरकर (रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली.
या सहा जणांकडून त्यांनी गुन्हयात चोरुन नेलेल्या रोख रक्कमेतील 14 लाख 7 हजार रुपये, गुन्हयात चोरीस गेलेले सर्व दागिने व चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती इर्टिगा कार (एचएच 04 ईटी 7895) व इर्टीगा कार एमएच 14. क्युएक्स 4399 अशा दोन चारचाकी असा एकुण 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या घटनेतील फिर्यादी तरुण मयुरेश काळे व आरोपी महिला एकमेकांना ओळखतात. मयुरेश याच्या घरात रक्कम आणि दागिने असल्याची अलका जेजुरकर या आरोपी महिलेस माहिती होते. घटनेच्या दिवशी दोघे शिर्डी येथे खरेदीसाठी गेले. दोघे शिर्डीला सोबत नेल्यानंतर तिच्या इतर साथीदारांनी मयुरेश याच्या घराची टेहाळणी करत दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून, घरात प्रवेश केला. घराच्या कपाटात ठेवलेली रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखोंचा मुद्देमाल त्यांनी चोरी केला. पुढील तपासकामी अटकेतील सर्वांना वावी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी (निफाड विभाग) निलेश पालवे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि नाना शिरोळे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, मेघराज जाधव, उदय पाठक, संदिप नागपुरे, हेमंत गरूड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, चालक विकी म्हसदे, महिला पोलीस अंमलदार योगिता काकड, छाया गायकवाड, अस्मिता मढ़वई यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आला आहे.