लाचखोर पीआय शिंदेंसह तिघांची कारागृहात रवानगी 

धुळे : हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्याच्या बदल्यात दीड लाख रुपयांची लाच मागणी आणि स्वीकार केल्याप्रकरणी अटकेत असलेले धुळे ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व दोघा हवालदारांची पोलिस कोठडी संपली आहे. त्यांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. तिघांच्या निलंबनाबाबतचा अहवाल नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर करण्यात आला आहे.

दोंडाईचा येथील एका माजी नगरसेवकावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे सर्वश्रुत आहे. ते राजकीय आकसापोटी दाखल असल्याची तक्रार आहे. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या गदारोळाच्या संधीचा फायदा उचलत त्या माजी नगरसेवकाविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी त्याच्याकडे  दोन लाख रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याघेण्याचे ठरले. त्यासाठी एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संमतीने व सांगण्यावरुन हवालदार अशोक पाटील व नितीन मोहने हे दोंडाईचा येथे त्याच्याकडे गेले.

दोंडाईचातील जैन मंदिराजवळ दीड लाख रुपये माजी नगरसेवकाकडून स्वीकारताना पाटील व मोहने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद सापडले. त्याच वेळी धुळ्यातील दालनातून एलीसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना चौकशीसाठी एसीबीने ताब्यात घेतले. त्यांचे रेकॉर्डिंग आढळल्याने त्यांच्यासह दोघा हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक झाल्यावर पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ती संपल्यावर वैद्यकीय तपासणीअंती त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांची  जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here