जळगाव : खूनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल केल्याचा राग मनात ठेवून फिर्यादीच्या घरत घुसून सामानाची तोडफोड तसेच शिवीगाळ व जीवे ठार करण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. भुषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ सुकलाल खंडया ठाकुर, पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (सर्व रा. तुकारामवाडी जळागाव), आकाश उर्फ ब्रो रविंद्र मराठे, चेतन उर्फ बटाटया रमेश सुशिर (दोघे रा. पिंप्राळा जळगाव) अशी या सहा जणांची नावे आहेत.
दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास सर्व सहा संशयित आरोपींनी तुकाराम वाडीत राहणाऱ्या अरुण भीमराव गोसावी यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातील सामानाची तोडफोड केली होती. याशिवाय त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. अरुण गोसावी हे सन 2022 मध्ये सुरेश विजय ओतारी याच्या खूनाच्या घटनेचे फिर्यादी आहेत. या खूनाची गोसावी यांनी फिर्याद दाखल केल्याचा राग मनात ठेवून या सहा जणांनी हा प्रकार केला होता.
याबाबत अरुण गोसावी यांनी फिर्याद दिल्याने सर्वांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा केल्यानंतर सर्व जण घटनास्थळावरुन पळून गेले होते. जुन्या वादातुन झालेला प्रकार पुन्हा होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने सर्व फरार सहा जणांना वाघनगर परिसरातुन ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली.
पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील सपोनि महेद्र वाघमारे, पोउनि दत्तात्रय पोटे, पोउनि दिपक जगदाळे सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकात पाटील, सचिन पाटील, ललीत नारखेडे, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकुर गणेश ठाकरे, संजीव मोरे, साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.