नाशिक : गोवा राज्यातून मद्याची तस्करी करणा-या पुरवठादारासह तस्कर मॅनेजर आणि हस्तक अशा तिघांना नाशिक ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. यापुर्वी एका जणास अटक करण्यात आली होती. महेशकुमार भुरालाल तन्ना, बिलाल उर्फ अदनान सैफुद्दीन मन्सुरी आणि आशिष अमरचंद फिरोदीया अशी नव्याने अटकेतील तिघांची नावे आहेत. वडनेर भैरव पोलिस स्टेशनला या मद्य तस्करीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीष फिरोदिया हा नाशिक शहरात मद्य तस्करी करणारा हस्तक आहे. या कारवाईत यापूर्वी रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे 448 बॉक्स हस्तगत करण्यात आले होते. आता आणखी 240 बॉक्स जप्त करण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन 2024 च्या पार्श्वभुमीवर दिनांक 5 एप्रिल रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणा-या ट्रकवर छापा टाकला होता. या छाप्यात 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात पदमसिंग बजाज या आरोपीस अटक करण्यात आली होती. त्याच्या कब्जातील ट्रकमधून गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचा 43 लाख रुपये किमतीचा (448 बॉक्स) मद्यसाठा जप्त करण्यात आला होता.
आरोपी पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातुन मद्यसाठा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेवून जाणार असल्याचे तपासात समोर आले होते. त्या माहितीच्या आधारे यापुर्वी अटकेतील पदमसिंग बजाज याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार हा मद्यसाठा गोवा राज्यातील महेश शेठ व बिलाल यांच्या सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेठ याच्या मार्फतीने त्यांच्या आर्या ट्रान्सपोर्टच्या वाहनातून गुजरात राज्यात राजु शेठ यांचेकडे पाठवण्यात येणार होता.
परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करीची पाळे-मुळे नष्ट करण्यासह यातील मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक गोवा व राजस्थान राज्यात रवाना करण्यात आले होते. स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने गोवा राज्यात जुना गोवा परिसरातील गोवा-कर्नाटक महामार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवली होती.
महेशकुमार भुरालाल तन्ना (मुळ रा. अहमदाबाद, गुजरात, हल्ली रा. पणजी, गोवा – गोवा राज्य निर्मित मद्य पुरवठादार), बिलाल उर्फ अदनान सैफुद्दीन मंसुरी (रा.सुरत, गुजरात, हल्ली रा.पणजी, गोवा. – गोवा राज्य निर्मित मद्य तस्करी मॅनेजर) आणि आशिष अमरचंद फिरोदीया (गंगापुर रोड, नाशिक) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपी आशिष फिरोदीया यास नाशिक शहरातील गंगापुर रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आशिष फिरोदीया हा परराज्यातील त्याच्या साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्हयासह गुजरात राज्यात मद्याची तस्करी करत होता. महेश तन्ना याचा नाशिक शहरातील हस्तक आशिष फिरोदीया याच्या अटकेमुळे मद्य तस्करीची राज्यातील पाळे-मुळे खोदण्यास पोलीसांना मदत होणार आहे. अटकेतील तिघांना चौदा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे हे करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्यासह येवला तालुका पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक संदिप मंडलीक, स्थागुशाचे पथकातील सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, हे.कॉ. नवनाथ सानप, संदिप नागपुरे, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विशाल आव्हाड, मनोज सानप, कुणाल मोरे, प्रविण गांगुर्डे, चालक तानाजी गारदे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.