जळगाव : यावल येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर मुकेश महाजन यांची भंडारा येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचे गृहोपयोगी साहित्य बदलीच्या जागी वाहून नेणा-या वाहनाने पेट घेतला. या घटनेत वाहनातील सर्व सामान जळून खाक झाले.
चोपडा-यावल रस्त्यावर गूळ नदीच्या पुलावर ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चोपडापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर देवयानी पेट्रोल पंपाजवळच गूळ नदीच्या पुलावर गाडीने अचानक पेट घेतला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेतील वाहन सावदा येथील होते.
गाडी पेट घेत असल्याचे वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने ते पुलाच्या कडेला थांबवून स्वतःसह जवळ बसलेल्या एका मुलाचे प्राण वाचवले. आगीची तीव्रता मोठी असल्याने गाडीतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. चोपडा न. प. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून निर्माण झालेली विस्कळीत वाहतूक सुरळीत केली.