नाशिक : मालेगाव शहरातील तरुणाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे. रफिक शहा उर्फ लम्बा रफिक असे त्याचे नाव आहे. पुढील कारवाई कामी त्यास मालेगाव छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दि. 15 एप्रिल 2024 रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात रफिक खान अन्दर खान (रा. संगमेश्वर, मालेगाव) हा त्याच्या दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौकात उभा होता. त्यावेळी रफिक शहा अमीन शहा उर्फ लम्बा रफिक व त्याच्या सोबत असलेल्या साथीदाराने मागील भांडणाची कुरापत काढून रफिक खान याची कोणत्यातरी धारदार हत्याराने हत्या केली होती. मयत रफीक खान यास डोक्यावर, हातावर व मांडीवर वार करून जिवे ठार केल्याप्रकरणी मालेगाव छावणी पोलीस स्टेशनला गु.र.न.117/24 भा.द.वि. 302, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर दोघा मारेकऱ्यांनी घटनास्थळावरुन पलायन केले हिते.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक (मालेगाव) अनिकेत भारती, सहायक पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधु, सहायक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. मुख्य आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याची माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमाड रेल्वेस्टेशन परिसरातून मुख्य आरोपी नामे रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक यास ताब्यात घेत अटक केली. फैसल नावाच्या साथीदारासह आपण हा गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले. पोलिस पथक फैसलच्या मागावर आहेत. अवघ्या दोन तासात एलसीबी पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हयात वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटर सायकल देखील हस्तगत केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदिप पाटील, पोहवा वेतन संवत्सरकर, पोना शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला.