जळगाव : ग्रामसेवकाच्या आडून सरपंच पतीने ठेकेदाराला त्याचे बिल काढण्यासाठी एक पेटीची लाच मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप मुळे धरणगाव तालुक्यात ग्रामपंचायतीसह ठेकेदारी वर्तुळात खळबळ माजली आहे.
धरणगाव तालुक्यातील फुलपाट या गावचे आप्पा या नावाने प्रसिद्ध असलेल्या ग्रामसेवकाच्या आडून सरपंच पती ठेकेदारास लाखो रुपयांची मागणी करत असल्याचे या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून लक्षात येते. आप्पांचे दहा टक्के (एक लाख) आणि आपले वेगळे अशी ठेकेदारास मागणी होत असल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकू येते. आपल्या घरावर पैसे मागणारे लोक वारंवार येत असून आपले बिल लवकर काढावे अशी विनवणी ठेकेदार सरपंच पतीला करतो. आपल्या सोळा लाखाच्या बिलात एवढे मार्जिन निघत नसल्याचे देखील ठेकेदार सरपंच पतीला सांगत आहे.
तुमचे तर कामच अपूर्ण आहे असे म्हणत सरपंच पती ठेकेदाराला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपले काम पूर्ण आहे, अपूर्ण कामाचे बिल कसे काय मागणार असे ठेकेदार सरपंच पतीला समजावून सांगतो. शेवटी तुम्ही आप्पांसोबत बोलून घ्या असे सरपंच पती ठेकेदाराला सांगतो.
महिला सक्षमीकरणाच्या देशात कितीही गोष्टी होत असल्या तरी पदाधिकारी महिलांचे पतीच कारभार चालवत असल्याचे या आणि अशा अनेक घटनांमधून आपल्याला दिसून येते. आर्थिक देवाणघेवाणीचा विषय आला म्हणजे महिला पदाधिकारी देखील पतीकडे बोट दाखवून मोकळ्या होतात