डी. डी. गवारे नावाचे एक आगळेवेगळे दोस्त!! जळगावच्या कारकिर्दीत गुन्हेगारी जमीनदोस्त

ज्ञानदेव धोंडीबा गवारे अर्थात डी. डी. गवारे हे नाव जळगाव जिल्ह्यावासियांना भलीभाती सुपरिचीत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव येथील सुपुत्र असलेले सेवानिवृत्त डीवायएसपी डी. डी. गवारे यांनी आपल्या जळगाव जिल्ह्याच्या पोलिस सेवेतील कारकिर्दीत जळगावकरांच्या मनावर एकप्रकारे राज्य केले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जळगाव जिल्हावासियांसाठी ते एक उत्कृष्ट पोलिस अधिकारी ठरले. जळगाव जिल्ह्याच्या गुन्हेगारीबाबत त्यांचा जेवढा दांडगा अभ्यास होता आणि आजही आहे तेवढा क्वचितच एखाद्या पोलिस अधिका-याचा असेल.

आपल्या अख्त्यारीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि आपल्या संपर्कात असणारे माध्यम प्रतिनिधी आदींच्या बारिकसारीक सवयी, त्यांचा स्वभाव, त्यांचे छंद आणि त्यांच्यातील कामाचे मेरीट आदी घटक क्षणात आजमावण्यात त्यांचा हातखंडा होता. कोणत्या पत्रकाराची लिखानशैली किती खोल अर्थात त्याची गहराई किती? त्याचा संबंधीत विषयाचा अभ्यास किती याच्यावर त्यांचे बारकाईने लक्ष रहात होते.

माझ्या गेल्या तिस वर्षाच्या कालखंडात गुन्हेगारी विषयावर पत्रकारिता करतांना, लिखान करतांना माझा अनेक पोलिस अधिका-यांसोबत संपर्क आला. कित्येक अधिका-यांचे विविध स्वभाव बघण्यात आले. त्यामधे डी. डी. गवारे हे नेहमीच आणी आजही अव्वल स्थानी राहिले. त्यांची जागा आजही कुणी हिरावू शकले नाही हे सत्य आहे. या तिस वर्षाच्या कालखंडात मला अनेक परिवर्तन देखील बघण्यास मिळाले.

मात्र आता काळ बराच पुढे सरकला आणि बदलला देखील आहे. परिवर्तन हा जगाचा नियमच आहे. सध्याच्या काळात बहुतेक जण राजाश्रयाची सावली शोधतात. स्वता:ची  प्रतिमा तयार करण्यासाठी स्वत:ला अगोदर तळपत्या प्रखर उन्हात उभे रहावे लागते याचे भान अनेकजण साफ विसरले आहेत. राजाश्रयाच्या रेडीमेड सावलीत खाकी काम करत असल्याचा अनेक लोक आरोप करतात. कुणाला या भाऊंचा आशिर्वाद, कुणाला त्या भाऊंचा आशिर्वाद असे चित्र सध्या दिसून येत असल्याचे लोक बोलतात. या आशिर्वादाच्या बळावर माजलेले अनेक कर्मचारी वरिष्ठांना नमस्कार विसरल्याचे देखील बोलले जाते.  

ग्राऊंड लेव्हलपासून उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या व सध्या सेवानिवृत्त असलेल्या डीवायएसपी डी. डी. गवारे यांनी त्यांच्या सेवा कार्यकाळात आपली काम करण्याची एक विशिष्ट शैली जपली. भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शक्य तेवढ्या लवकर कॅबीनमधे बोलावून, त्याला वेळ देऊन योग्य न्याय दिला जात असे. जसा आपला वेळ महत्वाचा तसा आलेल्या अभ्यागतांचा वेळ देखील महत्वाचा हे लक्षात घेऊन ते काम करत होते. जो वेळेची आणि व्यक्तीची किंमत करतो, वेळ आणि व्यक्ती त्याची किंमत करतो. मात्र सध्या काही अधिकारी आपल्या कॅबीनमधे एकाच वेळी अनेक परिचितांना बोलावून एकप्रकारे दरबार भरवतात. त्यामुळे एकाला वाटते की दुसरा बाहेर जाईल तेव्हा आपण आपल्या कामाचे बोलू. दुस-याला वाटते की तिसरा बाहेर जाईल तेव्हा आपण आपल्या कामाचे बोलू. दरम्यानच्या कालावधीत इकडच्या तिकडच्या गप्पा करुन संबंधीत अधिकारी वेळ मारुन नेतो. बाहेर प्रतिक्षा यादीत बसलेल्या अभ्यागतांसह कर्मचारी देखील ताटकळतात. बाहेर प्रतिक्षा यादीवरील लोकांना वाटते की आत बसलेले लोक रिकामे तर बसले नाहीत? ते केव्हा बाहेर येतील याची बाहेरचे लोक वाट बघतात. मात्र हा वेळ मारुन नेण्याचा प्रकार असल्याचे लोक शेवटी बोलूनच दाखवतात. ही खास शैली काही अधिका-यांनी अलिकडच्या काळात राबवली असल्याचे बोलले जाते. मात्र सेवानिवृत्तीनंतर अशा अधिका-यांसोबत कुणी संपर्क ठेवत नाहीत. सेवानिवृत्तीनंतर आपल्याला कुणीही भेटायला येणार नाही असे भविष्य ते अधिकारी स्वत:च वर्तवतात.

आज कालच्या काही अधिकाऱ्यांना अशी भिती वाटत असावी की अभ्यागतांना कॅबीनमधे एकटे एकटे भेटण्यास बोलावल्यास काही दडपण येईल का? किंवा भेटावयास आलेला पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ता आपले काही बिंग फोडेल काय? या भीतीपोटी असे बहुतेक अधिकारी अशा अभ्यागतांना हेतूपुरस्सर एकत्रित बोलावतात. कुणाला काही महत्त्वाची माहिती द्यावयाची असते, कुणाला कायदा व सुव्यवस्थेबाबत काही माहिती  सांगायची असते, कुणाला शहरात चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाबींची माहिती द्यायची असते, कुणाला आपली काही व्यक्तिगत अडचण कथन करायची असते. परंतु अशा एकत्रित बोलावल्याने कुणीही आपल्या जवळची माहिती अशा  अधिका-यास  देऊ शकत  नाही. उगाच वैर नको म्हणून अभ्यागत माहिती देण्याचे टाळतात. त्यामुळे गुन्हेगारी करणाऱ्यांचे फावते असाच काहीसा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीने चालू असल्यास मग मात्र बोलणे टाळलेलेच बरे. परंतु असा प्रकार जनमानसात पोलिसांची प्रतिमा बदनाम होण्यास कारणीभूत ठरतो.

डी. डी. गवारे यांच्या सेवाकार्यकाळात अनेक सामाजिक कार्यकर्ते, बातमीदार, पत्रकार अशा बाबी त्यांना भेटून सांगत होते. त्यामुळे पोलिसांचा वचक वाढण्यास मदतच होत असे. अनेक लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून गवारे साहेबांकडून निश्चितच मदत होत असे. अनेक लोकांचे अनेक प्रश्न शक्य त्या पातळीवर त्यांच्याकडून निश्चितपणे सोडवले जात होते. परंतु अलीकडे काही अधिकारी मात्र नको ही बला या भावनेतून अभ्यागतांना वाटेस लावतात. त्यामुळे सध्या जळगाव जिल्ह्यात पोलिसांची प्रतिमा आणि कामगिरी हवी तशी दिसून येत नसल्याचे म्हटले जात  आहे. डी.डी. गवारे साहेबांच्या कार्यकाळात राजकीय दबाव अथवा दडपण नव्हते असे नाही. दडपण अथवा दबाव असला तरी ते त्यांच्या स्तरावर ते राजकीय दडपण सहजपणे हाताळण्यात माहीर झाले होते. डी. डी. गवारे हे जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी सर्व पोलीस स्टेशनच्या मदतीने सहज हाताळत होते त्यामुळे ती नियंत्रणात होती. इतकेच नव्हे तर डी.डी. गवारे यांनी खाजगी वेशात हातात साधी काठी नसताना अवघ्या दोन – चार कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोपडा, पाळधी, सावदा, रावेर अशा अनेक ठिकाणच्या दंगली निडरपणे हाताळल्या आहेत. त्यांच्या विरोधात ना करप्शन, ना इल-ट्रीटमेंट, ना बेबनाव, ना गट – तट अशा बाबी दिसून येत होत्या.

पत्रकारांना ते पालकांसारखे वाटत होते. पत्रकारांचे संघटन किंवा त्यांच्यामध्ये देखील बेबनाव होणार नाही याचीही ते काळजी घेत होते. दोन्ही पोलीस अधीक्षकांचे आदेश ते व्यवस्थितपणे हाताळत होते. मध्य प्रदेशातून एक दोन नव्हे तर शेकडो गुन्हेगारांना दोन-चार कर्मचारी व्यवस्थित आणत होते. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अशा  प्रसंगात त्यांनी निर्माण होऊ दिला नाही अथवा बातमीदार कधीही नाराज झाला नाही. रोडवरील जबरी चोऱ्या आणि दरोड्याचे प्रकार त्यांच्या कार्यकाळात जवळजवळ थांबले होते. नेमकी हिच बाब समस्त जळगावकर जनतेच्या स्तुतीस पात्र ठरली होती.

नामांकीत वकील तथा बॅरिस्टर उज्वल निकम हे देखील पोलीस खात्याचे आणि विशेषत: डी.डी. गवारे साहेबांचे कौतुक करत होते हे उल्लेखनीय म्हणावेलागेल. त्यांच्या काळात पत्रकार कधीही कोणत्याही बातमीपासून वंचित नव्हते. या सर्व बाबी पोलीस अधीक्षकांच्या पश्चात ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हाताळल्या पाहिजे ते बहुतेक पोलीस अधिकारी सध्या मी त्या गावचा नाही असे का वागतात? असा प्रश्न सर्वसामान्यांना सध्या पडला आहे. त्यांच्या कार्यकाळात पियुष नावाच्या बालकाचे अपहरण झाले होते. त्या बालकाचे प्राण धोक्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक इशु सिंधु आणि पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याल होते. त्यांच्या कार्यकाळात त्या अपह्रुत बालकाचे प्राण धोक्यात आले होते. या तपासावर विपरीत परिणाम होऊ नये तसेच बालकाच्या जीवीतास हाणी पोहोचू नये म्हणून पत्रकारांनी या बातमीला तुर्तास प्रसिद्धी देऊ नये अशी विनवणी वजा आवाहन करण्यात आले होते. पत्रकारांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आणि संवेदनशील असतांना देखील दोघा पोलिस अधिक्षकांच्या विनंतीवरुन बालकाचा शोध लागेपर्यंत ती कुणीही प्रसिद्ध केली नाही. तत्कालीन तपास पथकाच्या मदतीने त्या अपह्र्त बालकास अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुरक्षीतरित्या ताब्यात घेण्यात आले. तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रकाश मुत्याल आणि अप्पर पोलिस अधिक्षक इशु सिंधू यांच्या उपस्थितीत त्या बालकास त्याच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. त्यानंतरच या घटनेचे व तपासकामाचे वृत्त पत्रकारांनी हेडलाईनच्या रुपात प्रसिद्ध केले. या तपासात तत्कालीन एलसीबी पोलिस निरीक्षक डी. डी. गवारे यांचा सिंहाचा वाटा होता. बालकाच्या या अपहरणातील सर्व अपहरणकर्ते आरोपी रातोरात अटक  झाल्यानंतर ती बातमी पत्रकारांना सविस्तर देण्यात आली होती. त्यात कोणताही दुजाभाव नव्हता.

आता या बाबी का हरवल्या आहेत याचा जिल्हा पोलिस प्रमुखांनी विचार करणे गरजेचे आहे. पत्रकार किंवा बातमीदार तसेच सामाजिक कार्यकर्ते हे काही पोलिसांच्या व्यवहारावर आणि कार्यशैलीवर लक्ष ठेवून असतात. लोकांना कायदा व व्यवस्था आणि पोलिसांची जरब हवी असते ती सध्या हरवली आहे असे कुणाला वाटत नाही का? तीच बाब लाचलुचपत खात्याची आहे. ज्यावेळी गवारे साहेब जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सुप्रिमो म्हणून कार्यरत होते तेव्हाही महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाया जळगाव जिल्ह्यातील होत्या हे विशेष. आता तो विभागदेखील निष्क्रिय झालाय, त्याचा वचक राहिलेला नाही असे म्हटले जाते. डी.डी. गवारे साहेब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कार्यरत होते तेव्हा पोलीस अधिकारी देखील चळाचळा कापायचे. इतर विभागाचे वर्णन न केलेले बरे. कुण्या एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख करुन अथवा कुणाला कमी लेखण्याचा कोणताही उद्देश नाही. पोलीस खात्यास ते दिवस परत  आणणे कोणाच्या हातात नाही का? आमच्या  संशयाला उत्तर आहे का? असल्यास आपल्याच पोलीस खात्याच्या दैनंदिन व्यवहारासाठी आणि  जरबेसाठी ते गरजेचे आहे असे सर्व सामान्यांना वाटते. तुर्तास एवढेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here