धुळे : राज्य राखीव पोलिस बलाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील गैरहजर पाच महिला नर्सिंग अधिका-यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे पाच हजारांच्या लाचेची मागणी करणारा सहायक समादेशक तथा पोलिस उप अधिक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. चंद्रकांत बाबुराव पारसकर असे या लाचखोर अधिका-याचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. यातील तक्रारदार व त्याच्यासोबतच्या पाच महिला नर्सिंग ऑफीसर 14 व 15 एप्रिल रोजी गैरहजर राहिल्या होत्या. तक्रारदाराकडून याबाबत पारसकर यांनी खुलासा घेतला होता. त्यानंतर तक्रारदाराच्या माध्यमातून पाच महिला नर्सिंग अधिका-यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकुण पाच हजार रुपयांची मागणी पारसकर यांनी केली.
मागणी पुर्ण झाली नाही तर सर्वांची रजा बिनपगारी केली जाईल असे देखील पारसकर यांच्याकडून पाच महिला अधिका-यांना तक्रारदाराच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. मात्र तक्रारदारास या पाच महिला अधिका-यांकडून पैसे जमा करुन पारसकर यांना देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने 20 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या कार्यालयात समक्ष तक्रार दिली. ठरल्यानुसार 22 एप्रिल रोजी पारसकर यांना त्यांच्या राहत्या निवासस्थानी पाच हजार रुपये देण्यात आले. मात्र पारसकर यांना आपल्याविरुद्ध एसीबी सापळा लागल्याचा संशय आला. त्यांनी हातात घेतलेली रक्कम खाली टाकून देताच त्यांना धुळे एसीबी पथकाने ताब्यात घेतले.
सहायक समादेशक चंद्रकांत बाबुराव पारसकर याच्याविरुद्ध पश्चिम देवपुर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.