धुळे : लोकांनी निवडून दिलेल्या अशिक्षीत – निरक्षर महिला ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने त्यांचे पतीच कामकाज बघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. साक्री तालुक्यातील मौजे म्हसदी (प्र. नेर) येथील रहिवासी असलेल्या अशिक्षीत – निरक्षर महिला ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने तिचा पतीच सर्व कारभार बघत होता. या पती महोदयाने एसीबीकडे केलेल्या तक्रारीवरुन पन्नास हजार रुपयांची लाच घेणा-या ग्रामसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या ग्रामसेवकाविरुद्ध साक्री पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघशाम रोहिदास बोरसे असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
तकारदार पती व त्यांची ग्रामपंचायत सदस्य पत्नी असे दोघेजण त्यांच्या वार्डातील विकासकामे मंजूर होण्यासाठी प्रयत्नशिल होते. त्यासाठी त्यांनी ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांची भेट घेतली होती. अंदाजपत्रकात नमूद बारा लाख रुपयांच्या मंजूर कामाच्या मुल्यापैकी विस टक्के अर्थात 2 लाख 40 हजार रुपये इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन आपणास दयावे असे या पती पत्नीला सांगण्यात आले. मात्र या महिला सदस्याच्या पतीला हे मान्य नव्हते. त्यामुळे या महिलेच्या पतीने धुळे एसीबी कार्यालयात याप्रकरणी लेखी तक्रार दिली. त्यानुसार रितसर प्रक्रिया करत सापळा लावण्यात आला.
ठरलेल्या रकमेपैकी पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याघेण्याचे ठरले. त्यानुसार पन्नास हजार रुपयांची लाचेची रक्कम ग्रामसेवक बोरसे यांनी घेताच त्यांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.