जळगाव : सुरु असलेली सट्टापेढी पोलिसाकरवी दुस-यास चालवण्यासाठी देण्यास भाग पाडले. याशिवाय झालेल्या मारहाणीची तक्रार घेतली नाही असा आरोप करत सट्टापेढी चालकाने पोलिस स्टेशनमधे धिंगाणा घातल्याचा खळबळजनक प्रकार काही दिवसांपुर्वी उघडकीस आला असल्याचे म्हटले जात आहे. ज्या एमआयडीसी पोलिस स्टेशनमधे हा प्रकार उघडकीस आल्याचे बोलले जात आहे त्याच पोलिस स्टेशनमधे काही दिवसांपुर्वी अन्य एका सट्टापेढी चालकास देखील मारहाण झाली होती. त्यामुळे या पोलिस स्टेशनच्या प्रभारी पोलिस निरीक्षकांची भुमिका संशयास्पद म्हटली जात आहे. दोनवेळा सट्टापेढी चालकांना मारहाणीचे प्रकार घडून देखील पोलिस अधिक्षक प्रभारी पोलिस निरीक्षकांवर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न जनतेला पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सट्टापेढी चालकांकडून कलेक्शन करणा-या कर्मचा-याने कादीर शेख नावाच्या सट्टापेढी चालकास घरुन बोलावले होते. तुझा दोन्ही ठिकाणचा धंदा तु कुणाल व त्याच्या साथीदारांना चालवण्यास देऊन टाक असे या जमाकर्त्या कर्मचा-याने सट्टापेढी चालक कादीर यास बजावले. पोलिसांचा हप्ता अर्थात सेक्शन तुला भरण्याची गरज नाही. त्याच्या बदल्यात तुला दररोज तिन हजार रुपये कुणाल व त्याच्या साथीदारांकडून मिळतील असे देखील कादीर यास त्या संबंधीत कर्मचा-याकडून सांगण्यात आले असे म्हटले जात आहे. त्या कलेक्शन कर्मचा-याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत कादिर याने त्याच्या अख्यत्यारीतील सट्टापेढीचे दोन्ही पॉइंट कुणाल व त्याच्या साथीदारांच्या हवाली केले.
सुरुवातीचे काही दिवस कादीर यास ठरलेली तिन हजार रुपयांची रक्कम देण्यात आली व नंतर बंद करण्यात आली असा कादीर याचा आरोप आहे. त्यानंतर काही दिवसांनी कादीरने कुणाल व त्याच्या साथीदारांची भेट घेतली असता त्याला त्यांच्याकडून जबर मारहाण झाली. तसेच त्याच्या खिशातील तिस हजार रुपये हिसकावून घेण्यात आल्याचा कादीर याचा आरोप आहे. पोलिस स्टेशनच्या त्या कलेक्शन कर्मचा-याच्या जिवावर आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप कादीर याने केला. मात्र आपली तक्रार दुर्लक्षीत करण्यात आल्याचे कादीर याचे म्हणणे आहे. आपल्याकडे या कलेक्शन कर्मचा-याचे कॉल डिटेल्स असल्याचे देखील कादीर याचे म्हणणे आहे. या कर्मचा-याच्या बळावर आपल्याला कुणाल व त्याच्या साथीदारांकडून मारहाण झाल्याचे कादीर याचे म्हणणे आहे. या त्रासाला वैतागून आपण आत्महत्या करुन घेऊ असे देखील कादीर याने म्हटले आहे.
या सर्व घटनेला प्रथम जबाबदार असलेल्या प्रभारी पोलिस निरीक्षकांवर काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. या घटनेच्या पुर्वी देखील एका सट्टापेढी चालकास मारहाण झाली होती. अवैध व्यवसाय आणि तो ऑपरेट करणा-यांना नेहमी नेहमी होत असलेली मारहाण हा एकुण प्रकारच गैरप्रकारात मोडला जातो. एक सट्टापेढी चालक पोलिस स्टेशनमधे येऊन धिंगाणा घालतो या प्रकाराला काय म्हणावे? इतर कसुरी करणा-या कर्माचा-यांना तातडीने मुख्यालयी जमा केले जाते. मात्र अवैध व्यावसायिकांना मारहाण करणा-यांना कर्माचा-यांना संबंधित पोलिस निरीक्षक का वाचवतात असा देखील एक प्रश्न उपस्थित झाला आहे. आता स्वत: पोलिस अधिक्षकच काय ती कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.