जळगाव : रात्रीच्या वेळी अवघ्या आठ महिन्याच्या बालकाचे अपहरण करणारे पाच जण भुसावळ तालुका पोलिसांनी अटक केले आहेत. यामधे एका महिलेचा समावेश आहे. या खळबळजनक घटनेतील हे बालक भुसावळ येथील अलका जीवन स्पर्श फाऊंडेशन या संस्थेत सापडले. त्यामुळे प्रकाशझोतात आलेली ही संस्था संशयाच्या भोव-यात सापडली आहे.
23 एप्रिल 2024 च्या मध्यरात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या साकेगाव येथील एका अवघ्या आठ वर्षाच्या बालकाचे तो झोक्यात झोपला असतांना अपहरण करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 96/24 भा.द.वि. 363, 451 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ येथील नारायण नगर, घोडेपीर बाबा दर्ग्यानजीक मोरया हॉलच्या समोर, शिवपुर कन्हाळा रोड वरील अलका जीवन स्पर्श फांउडेशन या संस्थेवर छापा टाकण्यात आला. या छाप्याचे फलीत म्हणून अपहरण करण्यात आलेले बालक याठिकाणी सापडले. त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दिपक रमेश परदेशी (रा. नारायण नगर, घोडेपिर बाबा दर्गाजवळ, शिवपुर कन्हाळा रोड भुसावळ, अमीत नारायण परिहार (रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता.भुसावळ), कुणाल बाळु वाघ (रा. शिंगारबडी साकेगाव ता. भुसावळ), बाळु पांडुरंग इंगळे (रा. ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, सुशिल नगर, दर्यापूर शिवार, ता. भुसावळ आणि रिना राजेंद्र कदम (रा.नारायण नगर, घोडेपिर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपुर कन्हाळा रोड भुसावळ) अशा पाच याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान एक संशयीत आरोपी पोलिसांना हवा आहे. याशिवाय दोन अल्पवयीन बालकांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुध्द यापुर्वी खून, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, चोरी व आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी बाळु इंगळे हे नंदुरबार जिल्हा पोलिस दलात बिनतारी संदेश विभागात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक कृष्णकांत पिंगळे, पो. नि. किसनराव नजन पाटील, पो.नि.बबन जगताप, सपोनि. विशाल पाटील, सफौ. विठ्ठल फुसे, पोहेकॉ. युनुस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मीक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, हे.कॉ. संजय तायडे, पोना. नितीन चौधरी, जगदिश भोई, राहुल महाजन, सफौ. सादीक शेख, पोहेकॉ, उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई, पोउपनिरी. वाघमारे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला आहे.