जळगाव : बँकेतून कर्ज काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र काढून देण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला दहा हजार व नंतर तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास एसीबीने आपल्या ताब्यात घेतले आहे. डिगंबर जावळे असे विवरे बुद्रुक तालुका रावेर येथील लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदारास बँकेतून कर्ज हवे होते. ते कर्ज काढण्यासाठी त्यांना काही कागदपत्रांची आवश्यकता होती. ती कागदपत्रे मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे याची भेट घेतली होती. आवश्यक कागदपत्रे काढून देण्याच्या मोबदल्यात दिगंबर जावळे याने तक्रारदारास सुरुवातीला दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपये मिळवण्याचा जावळे याने प्रयत्न केला. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांनी एसीबीकडे जाऊन आपली तक्रार नोंद केली.
21 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रारदारास लाचेची मागणी झाल्याचे पडताळणी अंती निष्पन्न झाल्यानंतर डिगंबर जावळे याच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन एन जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सूर्यवंशी,पोकॉ सचिन चाटे यांच्यासह कारवाई व मदत पथकातील पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, चालक सफौ सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पोकॉ प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.