चारित्र्याचा संशय – पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक

On: May 6, 2024 12:23 PM

जळगाव : चारित्र्याच्या संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे शनिवारी मध्यरात्री घडली. भारताबाई कैलास गायकवाड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मयत महिलेचा पती कैलास एकनाथ गायकवाड (रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला शनिवारी रात्रीच अटक केली आहे.

संशयित आरोपी असलेला कैलास हा त्याची पत्नी भारताबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासोबत नेहमी वाद घालत असे. तो तिला मारहाण तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ देखील करत होता. या प्रकारास कंटाळून ती मुलगी योगिता हिच्यासोबत माहेरी रोहिणी येथे राहण्यास आली होती. दोघातील वाद मिटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारताबाईच्या वडिलांनी जावई कैलास याला घरी बोलावले होते.

त्याची समजूत काढल्यानंतर तो सासरी रोहिणी येथेच रहात होता. दरम्यान शनिवारी कैलास व भारताबाई यांच्यात पुन्हा वाद उफाळला. यात कैलासने भारताबाईच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केला. नातेवाइकांनी भारताबाईस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे व त्यांच्या स्टाफने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. मयत भारताबाईचा भाऊ गणेश माळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कैलास एकनाथ गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment