जळगाव : लग्न झालेल्या आणि मुलेबाळे असलेल्या महिलांना अविवाहित असल्याचे दाखवून त्यांचे अविवाहित तरुणांसोबत बनावट लग्न लावून देत त्यांची लाखो रुपयात फसवणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. मोना दादाराव शेंडे, सरस्वती सोनू मगराज (दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (रा. पांढुर्णा, मध्य प्रदेश), सरलाबाई अनिल पाटील आणि उषाबाई गोपाल विसपुते (दोन्ही रा. नांदेड, ता. धरणगाव) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.या पाच महिलांच्या टोळीला सोमवारी कासोदा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने सर्व महिलांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
जळगाव जिल्ह्यात गरजू उपवर तरुणांचा शोध घेऊन त्यांना मध्यस्थांमार्फत अगोदरच विवाहित असलेल्या बनावट मुली दाखवून लग्नासाठी 2 ते 5 लाख रुपये उकळण्याचा या महिलांचा गोरखधंदा सुरु होता. सरला पाटील व उषाबाई विसपुते यांनी 21 एप्रिल रोजी तीन तरुणींचे कासोदा येथील तीन तरुणांसोबत अशा प्रकारचा विवाह लावून देत त्यांची फसवणूक केली. या लग्नासाठी तिघा गरजू उपवर मुलांच्या परिवाराकडून मिळून 4 लाख 13 हजार रुपये घेतले होते. नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने या तरुणाच्या चिंताग्रस्त वडिलांनी आत्महत्या केली होती.
या घटनेच्या तपासातून पोलिस पथक या महिलांपर्यंत जाऊन धडकले. काही दिवसांपूर्वी विवाह झालेला असल्याने या तीन महिला कासोदा येथे असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने लग्न लावून देणाऱ्या नांदेड येथील महिलांना देखील अटक करण्यात आली. स.पो.नि. नीलेश राजपूत, सहायक फौजदार रवींद्र पाटील, मनोज पाटील, पो.हे.कॉ. राकेश खोंडे, किरण गाडीलोहार, इम्रान पठाण, जितेश पाटील, नितीन पाटील, सविता पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.