धुळे : पान टपरीवर गुटखा विक्री करु देण्यासह खासगी वाहनातून प्राण्यांची वाहतुक बिनदिक्कत करु देण्याच्या बदल्यात तडजोडीअंती बारा हजार रुपयांच्या लाचेचा दुसरा टप्पा घेतांना पंटरसह पोलिस कर्मचारी धुळे एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. अझरुद्दीन शेख असे धुळे येथील आझादनगर पोलिस स्टेशनच्या या कर्मचा-याचे नाव आहे. तसेच अब्दुल बासित अन्सारी असे लाच स्विकारणा-या पंटरचे नाव आहे.
या लाच प्रकरणातील तक्रारदाराचे धुळे येथील आझादनगर पोलिस स्टेशन हद्दीतील मौलवीगंज चौकात पानाचे दुकान आहे. याशिवाय तक्रारदाराचे खासगी वाहन देखील आहे. तक्रारदार त्याच्या दुकानावर गुटखा विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती आझादनगर पोलिस स्टेशनचा कर्मचारी अझरुद्दीन शेख याला समजली. याशिवाय तक्रारदार त्याच्या खासगी वाहनातून प्राण्यांची वाहतुक देखील करत असल्याचे या पोलिसकर्मीला समजले. त्यामुळे हे दोन्ही उद्योग व्यवस्थित सुरु ठेवायचे असतील, कारवाई टाळायची असेल तर तिस हजार रुपये द्यावे लागतील असा निरोप पोलिस कर्मचारी अझरुद्दीन शेख याने तक्रारदाराला दिला होता.
त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख व त्याचा पंटर अब्दुल बासित अन्सारी यांनी तक्रारदाराला 4 मे रोजी पारोळा रोड परिसरात बोलावले होते. त्यावेळी तक्रारदाराकडून लाचेचा पहिला टप्पा म्हणून 17 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख याने दुस-या दिवशी 5 मे 2024 रोजी राहिलेले तेरा हजार रुपये पंटर अब्दुल बासित अन्सारी यांच्याजवळ देण्यास तक्रारदाराला सांगितले.
मात्र लाचेच्या अधिक मोहात पडलेला पोलिसकर्मी दुस-या टप्प्यात अडकला. तक्रारदाराने वेळ मारुन नेत 6 मे रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून तक्रार दिली. या तक्रारीची त्याच दिवशी पडताळणी केली असता तडजोडीअंती तेरा हजाराच्या दुस-या टप्प्यात पुन्हा एक हजाराची तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले. बारा हजार देण्याघेण्याचे निश्चित झाले. ठरल्यानुसार पोलिसकर्मी अझरुद्दीन शेख याच्या सांगण्यानुसार पंटर अब्दुल अन्सारी हा लाच घेण्यासाठी पान दुकानासमोर प्रकट झाला. त्याचवेळी दबा धरुन बसलेले एसीबी पथक सक्रीय झाले. त्यांनी पंटरला लाच घेतांना पकडले.
पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख व पंटर अब्दुल बासित अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरुद्ध आझादनगर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अ व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.