जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : पती पत्नीचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते. जोपर्यंत पती पत्नीमधील विश्वासाचे नाते कायम असते तोपर्यंत दोघांचा संसार सुरळीत सुरु असतो. मात्र ज्यावेळी या नात्यातील विश्वासाची दरी वाढू लागते तेव्हा मात्र संसाराला कमी अधिक प्रमाणात ग्रहण लागण्यास सुरुवात होते. या अविश्वासातून पती पत्नीवर अथवा पत्नी पतीवर चारित्र्याचा संशय घेण्यास सुरुवात होते. बहुतेक घटनांमधे पती आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत असतो. त्यातून कित्येकदा असामाजिक, अप्रिय घटना देखील घडतात. कित्येक घटनांमधे या संशयातून पतीला दारुचे व्यसन जडते. दारुच्या आहारी पती गेल्यानंतर संसाराची तर वाट लागते. त्यासाठी पती व पत्नी या दोघांनी समंजसपणाची भुमीका घेणे गरजेचे असते.
चाळीसगाव तालुक्याच्या रोहिणी या गावातील रहिवासी असलेल्या भारताबाई हिचा विवाह त्याच तालुक्याच्या ओझर येथील कैलास गायकवाड याच्यासोबत झाला होता. मोलमजुरी करणा-या कैलास सोबत विवाह झाल्यानंतर भारताबाई सासरी ओझर येथे राहण्यास आली. सुरुवातीचे काही दिवस भारताबाई आणि कैलास या दोघा पती पत्नीचा संसार सुखात सुरु होता. मात्र काही दिवसातच कैलास हा भारताबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे दोघा पती पत्नीमधे वादाची ठिणगी पडू लागली. त्यातून तो तिला वेळप्रसंगी मारहाण व शिवीगाळ देखील करु लागला. काही दिवसांनी हा रोजचा प्रकार झाला. पती कैलासपासून होणारा त्रास असह्य झाल्यानंतर ती हा प्रकार माहेरी सांगू लागली. मात्र दोघांच्या संसारात हस्तक्षेप नको म्हणून तिला माहेरचे लोक तिची समजूत घालण्यापलीकडे काही करत नव्हते. अनेकदा भारताबाईने तिचा पती कैलास याच्या पोलिस स्टेशनला देखील तक्रारी केल्या. पोलिसांनी देखील त्याला अनेकदा समजावले. मात्र कैलासच्या वागण्यात फार काही बदल झाला नाही.
या रोजच्या प्रकाराला भारताबाई मोठ्या प्रमाणात वैतागली. रागाच्या भरात तिने सरळ आपले माहेर गाठले. ती माहेरी रोहीणी या गावी आपल्या मुलीसह भावाकडे राहण्यास आली. तिने कैलासपासून आपल्याला कसा त्रास होतो याचा पाढाच आई, वडील आणि भाऊ गणेश माळी यांना वाचून दाखवला. शेळीपालन करुन तिचे आई वडील आपला चरितार्थ चालवत होते. तिचा भाऊ मिळेल त्या वाहनावर चालकाचे काम करत होता. एकंदरीत मोलमजुरी करुन जेमतेम घरखर्च भागवणा-या आई वडील आणि भावाकडे ती राहण्यास आली. कसाबसा संसाराचा गाडा ओढणा-या आईवडीलांकडे विवाहीत भारताबाई आणि तिच्या मुलीची अजून भर पडली.
भारताबाई माहेरी रोहिणी येथे राहण्यास आल्यानंतर कैलास देखील तिच्यापाठोपाठ आला. त्यावेळी भारताबाईच्या आई वडीलांनी त्याला समजावले. भारताबाईला घेण्यासाठी आलेला कैलास याने सासरी रोहीणी येथेच मुक्काम ठोकला. त्यामुळे अगोदरच लहान असलेल्या घरात कैलासची अजून भर पडली. भारताबाई, तिचा पती कैलास आणि मुलगी असे तिघे जण रात्रीच्या वेळी घरात झोपू लागले. भारताबाईचे आई वडिल व तिचा भाऊ गणेश याची मुलगी असे घरासमोरच्या मोकळ्या जागेत झोपू लागले. आता तरी कैलास आणि भारताबाई यांच्यातील वाद संपुष्टात येईल असे तिचे आईवडील व भाऊ गणेश यांना वाटत होते. मात्र दोघा पती पत्नीमधील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती.
4 मे 2024 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सर्वजण आपापल्या जागी झोपी गेले. दुसरा दिवस सुरु झाल्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक घरातून काहीतरी जड वस्तू खाली पडल्याचा मोठा आवाज बाहेर आला. भारताबाईच्या आईने हा आवाज ऐकला. ती लागलीच मुलगा गणेशकडे धावत आली. तिने सर्वांना सांगितले की घरात काहीतरी जड वस्तू पडल्याचा मोठा आवाज आला. काही वेळाने घरातून भारताबाईची मुलगी योगिता हिचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. काहीतरी अप्रिय घटना घडल्याची भिती सर्वांच्या मनात घर करुन गेली. सर्वांनी आत डोकावून पाहिले असता भारताबाईचे डोके फुटलेले होते. तिच्या डोक्याजवळ रक्त जमलेले होते. तसेच तिच्या डोक्याजवळ एक भलामोठा दगड देखील पडलेला होता. भारताबाईच्या जवळ तिची मुलगी योगिता रडत असल्यामुळे तसेच कैलास तेथे हजर नसल्यामुळे नक्कीच अप्रिय घटना घडली होती.
सर्वांनी आत जावून घटनास्थळाची पाहणी केली असता भारताबाई मरण पावल्याचे त्यांना दिसून आले. घरात माती ठोकण्यासाठी आणलेला दगड भारताबाईच्या डोक्यात हाणून कैलास पळून गेला होता. घरात ठेवलेला दगड तिच्या मरणासाठी एक माध्यम ठरला होता. गावातील स्थानिक डॉ. बढे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले असता त्यांनी भारताबाई मरण पावल्याचे सर्वांना सांगितले. भारताबाईचा पती कैलास गायकवाड यानेच तिची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची सर्वांची खात्री झाली. दरम्यान कुणीतरी या घटनेची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला कळवली.
माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. मयत भारताबाईचा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मयत घोषित केले. रात्रीच या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गु.र.न. 115/24 भा.द.वि. 302 तसेच 498 अ नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला.
मयत भारताबाईचा भाऊ गणेश माळी याने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार कैलास गायकवाड याच्यविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. पळून गेलेल्या कैलास गायकवाड याला मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी आणि त्यांच्या पथकाने तातडीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक कुणाल चव्हाण व हे.कॉ. शांताराम पवार करत आहेत.