जळगाव : डोळ्यात मिरची पावडर फेकून, चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी (लुट) करणाऱ्या आरोपींना जामनेर पोलीसांनी पकडले आहे. दि.10 मे 2024 रोजी दुपारी 12.45 वाजेचे सुमारास जामनेर येथील आयएफडीसी बँकेत काम करणारे रिलेशन मॅनेजर सागर हिरसिंग चव्हाण (रा. गोंदेगांव ता. जामनेर) हे हिंगणे बुद्रुक ता. जामनेर येथून नेरी गावाच्या दिशेने त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलने येत होते. कर्जदारांकडून जमा केलेल्या कर्जाच्या हप्त्याची 60 हजार रुपयांची रक्कम त्यांच्यासोबत होती. हिंगणे गावाकडून नेरी कडे येत असतांना दोघा अज्ञात इसमांनी मोटार सायकलने सागर चव्हाण यांचा पाठलाग केला होता.
दोघांनी त्यांची मोटार सायकल अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांच्याकडील साठ हजार रुपये असलेली पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली होती. सागर हिरसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या घटने प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 248/2024 भा.दं. वि. 394, 397, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याची माहिती मिळताच आरोपींचे वर्णन व तांत्रीक तपासाच्या आधारे जामनेर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचा-यांनी दोघा आरोपींना निष्पन्न करून त्यांना हिंगणे-गाडेगांव येथील जंगलात शिताफीने पाठलाग करत ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून एका तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात जामनेर पोलिसांना यश आले आहे.
आरोपींनी लुटलेल्या रक्कमेपैकी 48 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, दोन मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 18 हजार रुपयांपर्यंतचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा कौशल्याने तांत्रीक आधार घेत आरोपींचा शोध घेत जबरी चोरीचा गुन्हा एक तासात उघड करुन त्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सागर काळे, पोहेकॉ अतुल पवार, पोहेकॉ गणेश भावसार, पोकॉ सागर पाटील, पोकॉ जितेंद्र ठाकरे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.