जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात कंपनीच्या कन्सोलिडेटेड वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ व नफा ९१ कोटी रुपये झाला आहे. जळगाव येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.
आर्थिक निकालाची वैशिष्ट्येः वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ७.० टक्क्यांनी विक्री वाढ. वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचा कन्सोलिडेटेड एबिटा (EBITDA) १६.८ % वाढला.
- चालू आर्थिक वर्षात एकत्रित कर पश्चात नफा हा ९१ कोटी रुपयांचा दिसतो, गत वर्षांची तुलना केली असता १२०.८ कोटी रुपये इतका तोटा होता.
- वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचे स्टॅण्डअलोन एबिटा (EBITDA) १०.३ टक्क्यांनी वाढला.
- वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी स्टॅण्डअलोन निव्वळ नफा (PAT) ४१.२ टक्क्यांनी वाढून तो ₹५५.५ कोटी झाला.
ऑर्डर बुक: सध्या कंपनीच्या हातात एकत्रित आधारावर, १९२५ रुपये कोटीच्या ऑर्डर्स आहेत. ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादन व्यवसायाच्या ३८३ कोटी रुपयांच्या, प्लास्टिक विभागाच्या ४७१ कोटी आणि कृषी प्रक्रिया (ऍग्रो प्रोसेसिंग) विभागाच्या १०७१ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स समाविष्ट आहेत.
कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले की,“ (क्लायमेट चेंज) हवामान बदलाला भारतासह संपूर्ण जग सामोरे जात आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. विशेषत: मूल्यवर्धित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या आव्हानांना सामोरे जात कंपनीने किरकोळ व्यवसायात २५ टक्क्यांची भरीव वाढ केली आहे. कंपनीने प्रकल्प-आधारित व्यवसाय धोरणात्मकरित्या कमी केला आणि किरकोळ आणि निर्यात बाजारांवर लक्ष केंद्रीत केले ज्यामुळे चांगला नफा कमावला आहे आणि महसूल मिश्रण (रेव्हेन्यू मिक्स) पूर्णपणे बदलले आहे. कापसासारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.
चालू आर्थिक वर्षात पावसाळा सामान्य असेल असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण व्यवसायावर थोडा परिणाम होऊ शकतो, तथापि, आम्ही व्यवसायाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले, आम्ही किरकोळ व्यवसाय वाढवून नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.” -अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव