जळगाव : वर्धा जिल्ह्यातील फुलगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्यातील तिघा आरोपींना जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. रोशन उर्फ बबलू नायडू, कुणाल उत्तम चावरे, त्रपुतीक बबलू नायडू अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या फुलगाव पोलीस स्टेशनला या तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. डुकरे पकडण्याच्या वादातून प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फुलगाव पोलीस स्टेशनला गु. र. नं. 445/24 भा.दं. वि. 307, 452, 141, 142, 143, 147, 148, 149, 34 या प्रमाणे अटकेतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रोशन, कुणाल आणि त्रपुतीक हे तिघे फरार झाले होते. फुलगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने या तिघांचे लोकेशन घेतले असता ते जळगावच्या शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत लपून बसले असल्याचे त्यांना समजले.
त्या माहितीच्या आधारे वर्धा पोलिसांनी शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान फुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह जळगावला येण्यास निघाले होते. शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार परिष जाधव, हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण यांनी तिघांना शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेत अटक केली. त्यांना वर्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.