हॉटेल रिसेप्शनिष्ट चोरट्यास चोरीच्या दागिन्यांसह अटक

जळगाव : दुबई येथून जळगावला मित्रांच्या भेटीसाठी आलेल्या आणि हॉटेलमधे वास्तव्यास असलेल्या तरुणाच्या बॅगमधील सोन्याचे दागिने चोरणा-या हॉटेल रिसेप्शनिष्टला दोन तासात जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव येथील स्टार पॅलेस लॉजींग व बोर्डींग येथे हा प्रकार घडला. केतन धोंडू पाटील (रा. पाळधी ता. मुक्ताईनगर) असे या रिसेप्शनिष्टचे नाव आहे.

राहुल मधुकर जाधव हा धुळे येथील रहिवासी तरुण सध्या दुबई येथे वास्तव्याला आहे. तो आपल्या मित्रांच्या भेटीला जळगाव येथे आला होता. जळगावला असतांना तो जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील हॉटेल स्टार पॅलेस लॉजींग व बोर्डींग येथे मुक्कामी होता. हॉटेलमधील मुक्कामादरम्यान राहुलची तब्येत बिघडली. त्यामुळे या हॉटेलच्या बेसमेंटमधे असलेल्या साई सिंधू हॉस्पिटलमधे तो दाखल झाला. या कालावधीत त्याने आपली सामानाची बॅग हॉटेलच्या काऊंटर रिसेप्शननिष्टकडे ठेवली.

हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने रिसेप्शनिष्टकडून ताब्यात घेतलेली बॅग  तपासली असता त्यातील सोन्याची चेन व दोन पेंडल असा ऐवज गहाळ झाल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे त्याने याबाबत रिसेप्शनिष्ट केतन पाटील याच्याकडे चौकशी केली. केतन पाटील याने आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही असे सांगितले. त्यामुळे राहुल जाधव याने जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध  पथकातील हे.कॉ. सलिम तडवी, पोलिस नाईक जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे, मिलींद सोनवणे, तुषार पाटील, जयेश मोरे आदींनी घटनास्थळी जावून सिसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच हॉटेल स्टाफची कसून चौकशी केली. या चौकशीत रिसेप्शनिष्ट केतन पाटील याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्याला पोलिस स्टेशनला आणून त्याची अधिक चौकशी करण्यात आली. चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला. राहुल जाधव याच्या बॅगमधील चोरी केलेला व लपवून ठेवलेला 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याने पोलिस पथकाला काढून दिला. त्याला अटक करण्यात आली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here