जळगाव : मेहुणबारे पोलिस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघांना 16 लाख 15 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमधे एका अल्पवयीनाचा समावेश आहे. दरोड्याच्या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 130/24 भा.द.वि. 395, 397 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 मे 2024 रोजी रात्री अडीच ते तिन वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीतील दहिवद या गावी घनश्याम धर्मराज पाटील या तरुणाच्या राहत्या घराच्या मागील खिडकीचे गज कापून सात अनोळखी इसमांनी प्रवेश केला होता. गावठी कट्ट्याचा धाक दाखवत लोखंडी व लाकडी दांडक्याने घनश्याम पाटील यास मारहाणीसह दरोडा टाकून 16 लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला होता. या मुद्देमालात सोन्याचे दागिने व मोबाईल आदींचा समावेश होता.
मेहुणबारे पोलिस स्टेशनला दाखल या गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. मध्य प्रदेशात अति दुर्गम भागात जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून एका अल्पवयीनासह कालूसिंग हुजारीया बारेला (52) रा. भामपुरा ता. सेंधवा जिल्हा बडवाणी आणि सुनिल मुरीलाल बारेला (21) (रा. बुलवानीया ता. सेंधवा जिल्हा बडवाणी या दोघांना शिताफीने अटक करण्यात आली आहे.
अटकेतील तिघांकडून 10 लाख 92 हजार रुपये किमतीचे 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन, विस हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल, तिन हजार रुपये किमतीचा वापरता मोबाईल, एक करवत असा एकुण सुमारे 16 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, पोलिस उप निरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ राहुल सोनवणे, मनोहर शिंदे (नेमणूक नाशिक गुन्हे शाखा युनिट 2), पोहेकॉ गोकुळ सोनवणे, पोना दिपक पाटील, पोकॉ. आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ. राकेश महाजन, पोकॉ. निलेश पाटील, पोकॉ. विनय पाटील (नेमणूक चाळीसगाव शहर पोस्टे), पोकॉ. गोरख चकोर (नेमणूक मेहुणबारे पोस्टे), पोकॉ, ईश्वर पाटील, पोकॉ गौरव पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह त्यांचे सहकारी पो.कॉ. निलेश लोहार व पथक करत आहेत.