नाशिक : आयपीएल मॅचवर सट्टा लावणा-या दोघांसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. ओझर परिसरात टाकण्यात आलेल्या या छापा कारवाईअंती ओझर पोलिस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायद्यासह विविध कलमाखाली एकुण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोघांना जागेवरच तर इतर सात जणांना चौकशी व तपासाअंती ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आय.पी. एल. सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहून लोकांकडुन पैशांची बोली लावत सट्टा खेळणारे व खेळवणारे सक्रीय झाले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या पथकासह ओझर दहावा मैल परिसरात छापा टाकून कारवाई केली आहे.
दिनांक 24 मे 2024 रोजी आय.पी.एल. मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स् या संघांचा क्रिकेट सामना सुरु होता. दरम्यान ओझर दहावा मैल परिसरात एका हॉटेलमध्ये या सामन्यावर बेटींग सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी हॉटेल फुडहब मधील संबंधीत रुममधे छापा टाकला. या कारवाईत भव्य चैतन्य दवे (25) रा. दहिसर, मुंबई व जतीन नवीन सहा (41) रा. धोबी अली, चरई, ठाणे पश्चिम या दोघांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले दोघे जण ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या इतर साथीदारांसह आय. पी. एल. सामन्यावर त्यांच्या कब्जातील मोबाईलव्दारे लोकांकडून पैसे लावून, घेवून बेकायदेशीररित्या सट्टा खेळतांना व खेळवतांना मिळून आले. या इसमांनी हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी संगनमताने त्यांच्या बनावट नावाने तयार केलेले आधारकार्ड खरे असल्याचे भासवले. तसेच बनावट सिमकार्डचा वापर करुन आय.पी.एल. सामन्यांवर बेटींग लावण्यासाठी वेगवेगळ्या आय.डी. व्दारे इतर बुकींसोबत बेकायदेशीररित्या ऑनलाईन जुगार, सट्टा लावून शासनाची व मोबाईल कपंन्यांची फसवणुक केली. त्यामुळे या सर्वांविरुद्ध ओझर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 107/24 भा.द.वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 34 सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4(अ) व 1, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छापा कारवाईत ताब्यात घेतलेल्या इसमांच्या कब्जातून विविध कंपन्यांचे 4 मोबाईल स्मार्टफोन व आय.पी. एल. बेटींगसाठी लावण्यात आलेले आकडे लिहिलेली वही, कॅल्क्युलेटर असा एकुण 22 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटकेतील सर्वांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जागेवरच अटक करण्यात आलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच चौकशीअंती मुंबई येथील त्यांचे इतर साथीदार प्रथम राजेश सुचक (23) रा. मुलुंड पश्चिम, मुंबई, विनोद सुभाषचंद्र गुप्ता (50) रा. विक्रोळी पुर्व, मुंबई, रमेश श्रीगोपाळ जयस्वाल (54) रा. अंधेरी पश्चिम, मुंबई, विशाल किर्तीकुमार मडीयों (49) रा. मुलुंड पश्चिम, मुंबई, निखिल विश्वंद विसरीया (46) रा. मुलुंड पश्चिम, मुंबई यांना देखील अटक करण्यात आली असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व त्यांचे सहकारी करत आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्यासह पोउनि दत्ता कांभिरे, पोउनि नाना शिरोळे, सहायक फौजदार शिवाजी ठोंबरे, हवालदार किशोर खराटे, मेघराज जाधव, उदय पाठक, पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, नितीन डावखर, मनोज सानप आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला.