जळगाव : रेतीच्या वाहतुकीसाठी सुरुवातीला दहा हजाराची मागणी व तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारणा-या तलाठ्यास जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकण्याची वेळ आली आहे. रविंद्र काशिनाथ पाटील असे चोपडा तालुक्यातील विटनेर येथील लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
या घटनाक्रमातील तक्रारदाराच्या सासऱ्याच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजुर झाले आहे. या घरकुलाच्या बांधणीसाठी तक्रारदारास रेतीची आवश्यकता होती. त्यामुळे रेतीच्या वाहतुकीसाठी तलाठी रविंद्र पाटील याने तक्रारदाराकडे या कामासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली. या पार्श्वभुमीवर तक्रारदाराने 27 मे रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार केली.
या तक्रारीची एसीबी कार्यालयाने 28 मे रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तलाठ्याने दहा हजाराऐवजी पाच हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तलाठ्याने पाच हजाराची तक्रारदाराकडून लाच स्विकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या अख्यत्यारीत सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी सहभाग घेतला. या कारवाईकामी मदत पथकात पोलिस निरिक्षक एन.एन. जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी सहभाग घेतला.
सर्व नागरीकांना जळगाव एसीबी कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-याने किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने शासकीय काम करुन देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ दुरध्वनी क्रं. 0257-2235477, मोबाईल क्रं. 8806643000 अथवा टोल फ्री क्रं. 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा.