पालघर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन स.पो.नि. आनंद काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अन्य दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत.
16 एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गडचिंचले येथे एका कारमधून आलेल्या दोघा साधू व त्यांचा कार चालक अधा तिघांची जमावाने हत्या केली होती.
सुशीलगिरी महाराज(35), चिकने महाराज कल्पवृक्ष गिरी(70) आणि त्यांचा कार चालक निलेश तेलगडे(30) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.
“स्लॅक सुपर्व्हिजन”चा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवून नंतर त्यांची बदली करण्यत आली होती. आता कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी कासा पोलिस स्टेशनचे तत्कालीन स.पो.नि. आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सहाय्यक फौजदार रवी साळुंखे व वाहन चालक नरेश धोडी यांनी सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार रवी साळुंखे व हे.कॉ. नरेश धोडी व संतोष मुकणे या दोघा हेड कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. कासा पोलीस स्टेशनला कार्यरत 35 पोलिस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्यत्र बदली करण्यात आली होती. सीआयडी कडून सदर गुन्ह्याचा तपास सुरु असून या प्रकरणी दाखल तीन तक्रारीत स्वतंत्रपणे चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी ठाणे विशेष न्यायालयात होत असून विभागीय चौकशी केली जात आहे.