जळगाव : नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा घरफोडी प्रकरणातील सोने चोपडा येथील एका व्यापाऱ्याला विकल्याची कबुली अटकेतील संशयिताने दिली होती. त्या कबुलीच्या आधारे नंदुरबार एलसीबी आणि शहादा पोलिसांनी बुधवारी चोपडा येथील माणक ज्वेलर्स येथून वीस लाख रुपयांचे सोने हस्तगत केले आहे.
शहादा तालुक्यातील पाटळदा येथील वसंत लक्षण शहा यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने लांबवले होते. याप्रकरणी राहुलसिंग मोतीसिंग भाटिया या संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील राहुलसिंग याने चोरीच्या घटनेतील दागिने चोपडा येथील माणक ज्वेलर्स या दुकानात विकल्याची कबुली दिली होती.
माणक ज्वेलर्सचे मालक प्रविण टाटिया, नवीन टाटिया यांना मंगळवारी शहादा येथे पोलिस पथकाने नेले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीचे 27 तोळे सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी शेरुसिंग शिकलिकर आणि राजेंद्रसिंह शिकलीकर यांच्या मागावर पोलिस आहेत.