तिघे अपहृत सुखरुप – चौघे अपहरणकर्ते अटकेत

On: June 5, 2024 6:28 PM

जळगाव : जळगाव येथील तिघा अपहृतांसह त्यांचे अपहरण करणा-या चौघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध  पथकाने अवघ्या चोविस तासांच्या आत जेरबंद केले आहे. चौघा परप्रांतीय अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तिघांची छत्तीसगढ राज्यातून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. रोहीत कैलास दर्डा, विशाल अनिल शुबवाणी आणि अजय ठाकरे अशी जळगाव येथील रहिवासी असलेल्या व सुटका झालेल्या तिघा अपहृतांची नावे आहेत. अश्वनी हरीषकुमार माखीजा (रा तेलीबांधा गल्ली नंबर 6 रायपूर (छत्तीसगढ), संजय आरतमनी मिश्रा (रा. रसुलहा तहसिल थाडापट्टी जि. प्रतापगढ उत्तरप्रदेश, दिलीप शेषनाथ मिश्रा (रा. न्यु चंगोरा भाटा थाना डी डी रायपुर – छत्तीसगढ) आणि आनंद श्रीतीर्थराज मिश्रा (रा, लखनऊ तेली बाग – उत्तर प्रदेश) अशी  अटकेतील चौघा अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

भुसावळ येथील रहिवासी असलेला तरुण सागर कमल लुल्ला यास 2 जून रोजी एका अनोळखी इसमाचा फोन आला. कैलास दर्डा, विशाल शुबवाणी आणि अजय ठाकरे या तिघांचे आपण अपहरण केल्याची माहिती पलीकडून बोलणा-या अनोळखी इसमाने सागर लुल्ला यास दिली. अपहरण करण्यात आलेल्या तिघांचे फोन देखील बंद येत होते. तिघांना सुखरुप बघायचे असल्यास 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी पलीकडून बोलणा-या व्यक्तीने दिली. त्यामुळे सागर लुल्ला याने जेमतेम 1 लाख 90 हजार रुपये संबंधीत अनोळखी इसमाच्या बॅंक खात्यावर ऑनलाईन वर्ग केले. मात्र पलीकडून बोलणारी व्यक्ती अजून रकमेची मागणी करत होता.

त्यामुळे सागर लुल्ला या तरुणाने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठत सर्व हकिकत कथन  केली. त्यानुसार अपहरणासह खंडणीचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.नि. बबन  आव्हाड यांच्या गुन्हे शोध पथकाने आपल्या कौशल्यासह तांत्रीक विश्लेषणाचा आधार घेत छत्तीसगढ गाठले. छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथील हॉटेल व लॉजेसची तपासणी केली असता एका हॉटेलमधे सात जण संशयीतरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली. त्या हॉटेलमधून तिघा अपहृतांसह चौघा अपहरणकर्त्यांना सुरक्षितरित्या ताब्यात घेत सर्वांना जळगावला आणण्यात आले.

अटकेतील चौघे खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती मिळाली. चौघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनी दिपक जगदाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, किरण पाटील, चंदु पाटील, गणेश ठाकरे आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment