जळगाव : पाचोरा येथील बाजोरीया ऑईल रिफायनरी तसेच धान्य व्यावसाय कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकास मारहाण करुन त्याचे हातपाय बांधून, चाकूचा धाक दाखवून 4 लाख 5 हजार रुपये रोख, तिजोरी, डीव्हीआर मशिन, मोबाईल असा एकुण 4 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तिघा अनोळखी चोरट्यांनी चोरुन नेला होता. 23 जुलै 2023 रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी सुरक्षा रक्षक प्रभाकर पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यच्या तपासकामी पाचोरा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ योगेश सुरेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण केले. तपासाअंती या गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी त्यांच्या घरी आले असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अल्ताप मसुद खान (रा.नुराणीनगर, जारगांव, ता.पाचोरा), सरफराज हसन शहा फकीर (रा. मुल्लावाडा, जामनेर रोड, पाचोरा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. या गुन्हयात त्यांचा साथीदार मुक्तार उर्फ धडया मेहबुब शेख (रा.नुराणीनगर, जारगांव पाचोरा) हा गुन्हा घडल्यापासुन फरार आहे.
अटकेतील दोघांकडून गुन्हयात वापरेलेले पिस्टलसारखे दिसणारे लायटर, सुरा (चाकु) व गुन्हयात गेलेली 50 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोउपनिरी प्रकाश चव्हाणके, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ योगेश सुरेश पाटील आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.