शेळके महाराजचे पुष्पावर प्रेम आले उसळून — तिच्या पतीला ठार करतो कारखाली चिरडून

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पळासखेडा या गावी किशोर शिवाजी पाटील हा 45 वर्ष वयाचा विवाहीत इसम रहात होता. पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा त्याचा “हम दो – हमारे दो” सुखी परिवार होता. त्याच्या मुलीला किर्तनाची आवड होती. त्यामुळे त्याची मुलगी आळंदी येथे किर्तनाचे शिक्षण घेत होती. त्या निमीत्ताने किशोरची पत्नी पुष्पा हिचे पुणे जिल्ह्याचा खेड आळंदी येथे नेहमी येणे जाणे सुरु होते. त्यातून तिची आळंदी येथील महाराज राजेंद्र गंगाधर शेळके याच्यासोबत ओळख  झाली. या मैत्रीचे रुपांतर घनिष्ठ मैत्रीत झाले. बघता बघता राजेंद्र शेळके महाराज आणि पुष्पा पाटील यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला आणि फुलतच गेला. दोघांच्या प्रेमाचा बहर प्रमाणाच्या बाहेर फोफावला आणि त्यांच्या प्रेमाने सर्व मर्यादा पार केल्याचे म्हटले जाते.

पत्नी पुष्पा हिची महाराज राजेंद्र शेळके याच्यासोबत ओळख असल्याचा फायदा तिचा पती किशोर पाटील घेऊ लागला. तो राजेंद्र शेळके याच्याकडून उधार पैसे मागू लागला. आपल्या विवाहीत प्रेयसीचा पती असल्यामुळे महाराज त्याला नकार देत नव्हता. जसे लागतील तसे तो किशोर पाटील यास उधार पैसे देत होता. त्यामुळे राजेद्र शेळके या महाराजला चांगलेच फावले होते. तो हक्काने पुष्पाला त्याच्याजवळ कधीही बोलावून घेत होता. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. पुष्पा आणि शेळके महाराज यांच्यातील प्रेमाचा आलेख वर वर जात होता.

किशोर पाटील याच्यावर हळू हळू कर्जाचा डोंगर वाढू लागला. किशोरच्या कर्जाला त्याची पत्नी पुष्पा वैतागली. पैसे मागणारे लोक त्याच्या घरापर्यंत येत होते. नेमका हा प्रकार पुष्पाला आवडत नव्हता. त्यामुळे ती किशोरसोबत वाद घालत होती. किशोर वरील कर्जामुळे पती पत्नीत वादाची ठिणगी पडत होती. ती वादाची ठिणगी कधी कधी  उग्र रुप धारण करत होती. एकंदरीत किशोरच्या कर्जामुळे त्याच्या घरातील वातावरण बिघडले. कर्जावरुन पती पत्नीत होणारा वाद नेहमीचा झाला. या कालावधीत पुष्पा आणि शेळके महाराज यांच्यातील प्रेमाने मोठे रुप धारण केले.  

पुष्पाचे शेळके महाराजकडे नेहमी नेहमी जाणे किशोरला आवडत नव्हते. त्यामुळे किशोर तिच्यासोबत वाद घालत होता. एकीकडे पती किशोर आणि दुसरीकडे प्रियकर शेळके महाराज अशा दुहेरी अडचणीत पुष्पा सापडली होती. पतीपेक्षा तिला प्रियकर शेळके महाराज जवळचा वाटत होता. त्यामुळे ती राजेंद्र शेळके महाराजच्या तालावर मार्गक्रमण करत होती. आपल्या प्रेमाच्या वाटेत पती किशोर आडवा येत असल्याचे पुष्पाने प्रियकर शेळके महाराजला सांगितले. त्यामुळे किशोरला आपल्या वाटेतून बाहेर काढण्याचा निर्णय दोघा प्रेमींनी घेतला. किशोर आपल्या वाटेतून बाहेर पडला म्हणजे पुष्पावर केवळ आपलाच  हक्क राहील आणि आपण तिचा केव्हाही उपभोग घेऊ शकतो असा  विचार शेळके महाराजने मनाशी केला. त्याला आपल्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी त्याने पुष्पाला सोबत घेत एक अघोरी नियोजन सुरु केले. त्याला चारचाकी वाहनाखाली चिरडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा शेळके महाराजच्या डोक्यात कुविचार आला. त्याचा हा कुविचार त्याने पुष्पाजवळ व्यक्त केला. पुष्पाने सर्व एकून घेत ती त्याच्या विचाराशी सहमत झाली.

Bhushan Shelar Head constable

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुष्पा तिचा पती किशोरसोबत प्रेमाने बोलू लागली. एरव्ही नेहमी कर्जावरुन आपल्यासोबत वाद घालणा-या पत्नी पुष्पाची वाणी एवढी सुमधूर आणि वागणूक एवढी मुलायम कशी काय झाली? हा प्रश्न किशोरच्या मनात येऊ लागला. राजेंद्र शेळके महाराजने दिलेल्या कानमंत्रानुसार ती किशोरसोबत वागत आणि बोलत होती. तिने पती किशोरला म्हटले की आता तुम्ही काही काळजी करु नका. शेळके महाराज आपल्याला मोठ्या प्रमाणात धनराशी देणार आहेत. त्या धनराशीतून तुम्ही तुमच्या डोक्यावरील सर्व कर्ज फेडून टाका. तिचे असे बोलणे किशोरला निश्चितच सुखकारक होते. मात्र तिच्या बोलण्यामागील षडयंत्र त्याला माहिती नव्हते. तिचे कट  कारस्थान केवळ तिच्यासह शेळके महाराजासह नियतीला माहिती होते. नियतीच्या पुढ्यात आपले मरण लिहून ठेवल्याचे माहिती नसल्यामुळे किशोरने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

ठरल्याप्रमाणे 31 मार्चच्या मध्यरात्री राजेंद्र शेळके महाराज हा त्याच्या ताब्यातील मारोती सियाज (MH 12 FS 0010) या कारने किशोर व पुष्पा यांच्याकडे आला. महाराज तुम्हाला पैसे देण्यासाठी आले आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत पैसे घेण्यासाठी कारमधे बसून जा असे पुष्पाने तिचा पती किशोर यास सांगितले. आपल्या डोक्यवरील कर्जाचा बोझा कमी होईल आणि पैसे मागणा-यांचा तगादा कमी होईल या विचाराने किशोरने शेळके महाराजसोबत जाण्यचा मनाशी विचार केला. पुष्पा आणि राजेंद्र शेळके महाराज या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तो कारमधे बसला. आपण आता पैसे घेण्यासाठी नव्हे तर शेळके महाराजच्या माध्यमातून यमाच्या दारात जात आहोत हे किशोरला ठाऊकच नव्हते.

31 मार्चला मध्यरात्री पुष्पाला मिळवण्याच्या नादात झपाटलेला आणि अंगात सैतान संचारलेल्या राजेंद्र शेळके महाराजने त्याच्या गाडीत बसलेल्या किशोर पाटील यास गाडीतून बाहेर फेकून दिले. अचानक झालेल्या या घटनेमुळे किशोर पाटील गांगरला. आता निश्चितच काही तरी अघटीत होणार याचा अंदाज त्याला आला. आता आपला बचाव करण्यासाठी काय करावे हा विचार करत असतांनाच शेळके महाराजने त्याच्या अंगावरुन गाडी नेत त्याला जबर  जखमी केले. या घटनेत किशोर ठार झाला. अशाप्रकारे हा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत शेळके महाराजने तेथून पलायन केले.

दरम्यान भडगाव तालुक्यातील पळासखेडा ते पारोळा तालुक्यातील तरवाडे या दोन गावांच्या मधे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काही दुचाकीस्वारांना एक इसम मयत अवस्थेत आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती पळासखेडा येथील पोलिस पाटील यांना समजली. त्यांनी या घटनेची माहिती भडगाव पोलिस स्टेशनला दिली. माहिती समजताच भडगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे व पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. काही वेळाने सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांनी देखील आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरील मयत इसम किशोर पाटील हा सुरुवातीला पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता. मात्र मृतदेहाची ओळख लवकरच पटली. या घटनेप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची  नोंद घेण्यात आली. या अकस्मात मृत्यूचा तपास स.पो.नि. चंद्रसेन पालकर यांच्याकडे देण्यात आला.

मयत किशोर पाटील याच्या मृतदेहाची पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी बारकाईने पाहणी केली असता त्यांना हा घातपात असल्याचा संशय आला. या अकस्मात मृत्यूच्या तपासादरम्यान मयत किशोरचे वडील शिवाजी पाटील यांची सखोल चौकशी करण्यात आली. मयत किशोर आणि त्याची पत्नी पुष्पा यांच्यात पैशाच्या विषयावरुन नेहमी वाद व्हायचे अशी माहिती शिवाजी पाटील यांनी पोलिसांना दिली. याशिवाय खेड आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज याचे किशोरच्या घरी  नेहमी येणे जाणे होते अशी  देखील माहिती शिवाजी पाटील यांच्याकडून पोलिसांना समजली. शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.नं. 104/24 भा.द.वि. 302, 201, 34 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपी अभयसिंह देशमुख यांच्याकडे देण्यात आला.

खूनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर संशयाची सुई सुरुवातीला मयत किशोरची पत्नी पुष्पा हिच्यावर स्थिरावली. महिला पोलिस कर्मचा-यासमक्ष तिची सखोल चौकशी करण्यात आली. तिने सांगीतले की आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज सोबत माझा परिचय होता. पती किशोर हा कर्जबाजारी झाला होता. राजेंद्र शेळके याच्या मदतीने आपण हा गुन्हा केला. राजेंद्र शेळके हा पैसे देण्यासाठी येणार आहे, त्या पैशातून तुम्ही लोकांची कर्जफेड करा असे किशोर यास खोटे सांगण्यात आले होते. तुम्ही महाराजसोबत त्याच्या गाडीत बसून जा, तो तुम्हाला पैसे देईन अशी बतावणी करुन किशोरला महाराजच्या गाडीत बसवून रवाना करण्यात आले. पोलिसांच्या ताब्यातील पुष्पाकडून एवढी माहिती समजल्यानंतर राजेंद्र शेळके महाराजला देखील तांत्रीक तपासाच्या मदतीने काही तासात ताब्यात घेण्यात आले.

त्याने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या वेळी वाटेत भडगाव तालुक्यातील पळासखेडा ते पारोळा तालुक्यातील तरवाडे या गावानजीक भर रस्त्यात किशोरला कारच्या बाहेर फेकून देण्यात आले. रस्त्यावर पडलेल्या किशोरच्या अंगावरुन महाराजने कार नेली. त्यात किशोरचा मृत्यू झाला. अशा स्वरुपाच्या गुन्ह्याचा घटनाक्रम समजल्यानंतर पुष्पा किशोर पाटील आणि राजेंद्र गंगाधर शेळके महाराज या दोघांना अटक करण्यात आली. राजेंद्र शेळके याने गुन्ह्यात वापरलेली पांढ-या रंगाची चार चाकी सियाज कार (MH 12 FS 0010) पुढील तपासकामी जप्त करण्यात आली. अशा  प्रकारे अवघ्या बारा तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी भडगाव पोलिसांना यश आले.

पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधिक्षक सौ. कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपी अभयसिंह देशमुख करत  आहेत. त्यांना भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, स. फौ. संजय काळे, स. फौ. रमण कंडारे, स. फौ. राजेंद्र पाटील, स.फौ. अनिल रामचंद्र अहिरे, पोहेकॉ. निलेश ब्राम्हणकार, पोकाँ भुषण शेलार, पोका भुषण मोरे, पोकाँ संदिप सोनवणे, पोका संभाजी पाटील (चालक) आदींचे सहकार्य लाभले. किशोरचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करुन त्याचा खून करणा-या शेळके महाराजसह या कटात सहभाग असणारी त्याची विवाहीत प्रेयसी पुष्पा या दोघांना अशाप्रकारे जेरबंद करण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here