२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती 

जळगाव, दि. ८ प्रतिनिधी  :- अल्माटी,कझाकस्तान येथे  ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या मान्यतेने आणि कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाच्या प्रयत्नातून आयोजित या स्पर्धेत जवळपास ३५ देशांमधून ६४० खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. 

या आशिया खंडातील महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावमधून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण देवचंद ठाकरे यांना क्षेत्र पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई, वर्ल्ड ज्युनियर आणि जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम केले आहे. भारतभरातून सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून बहुमान मिळवणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

आठ, दहा, बारा, चौदा, सोळा व अठरा अशा विविध वयोगटात स्पर्धा खेळविली जाणार असून  स्विस् लिग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यांअंती अंतिम विजेते घोषित केले जातील. भारताकडून आपले खेळाडू यात सहभागी असून पदकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रवीण देवचंद ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक,संयोजक,प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात.

या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे जिल्हा संघटनेचे व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. या त्यांच्या यशासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख,पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील,जैन स्पोर्ट्सचे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अजित घारगे,नरेंद्र पाटील,संजय पाटील,यशवंत देसले,तेजस तायडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रविण ठाकरे यांना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके,कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे,नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी बी भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here