जळगाव : सैन्य दलात जवान असल्याची फोनवर बतावणी करत जवानांची वैद्यकीय तपासणी करायची असल्याचे खोटे सांगत जळगावच्या महिला डॉक्टरची सव्वा लाखात ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगावच्या महिला डॉ. सुजाता महाजन यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. फोनवर बोलत असतांना डॉ. सौ. महाजन यांच्या फोन पेची संपूर्ण माहिती पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीला समजताच त्यांच्या बँक खात्यातून सव्वा लाखाची रक्कम तात्काळ वजा झाली. 21 मे रोजी घडलेल्या या घटनेबाबत 10 जून रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सुजाता महाजन यांना दि. 20 मे 2024 रोजी एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना आपण सैन्य दलातील अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडे जवानांची तपासणी करायची असल्याचे त्या अज्ञाताने त्यांना फोनवर बोलतांना सांगितले. त्याने डॉक्टरांना त्यांचे व्हिजिटिंग कार्ड मागीतले. डॉक्टरांच्या चालकाने त्याच्या मोबाईलवरुन त्याला व्हिजिटिंग कार्ड पाठवले. दुसऱ्या दिवशी महिला डॉक्टरचे पती डॉ. प्रमोद महाजन यांच्यासोबत समोरील व्यक्ती फोनवर बोलला. त्याने 40 ते 50 जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन पे क्रमांक दिला. त्याचवेळी पलीकडून बोलणाऱ्या ठगाने डॉ. सुजाता महाजन यांच्याकडून फोन पे ची संपूर्ण माहिती घेतली. बोलणे सुरू असतांनाच डॉ. महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात झाली. काही वेळातच त्यांच्या खात्यातून 1 लाख 24 हजार 992 रुपये ट्रान्सफर झाले.