जळगाव : मध्य प्रदेशातील भांडणाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पती पत्नीचे रावेर तालुक्यातील निंभोरा सिम व रसलपूर शिवारात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आले. दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ माजली आहे. दोघांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
महिलेचा मृतदेह पाल रस्त्यावर सोमवारी सकाळच्या वेळी आढळून आला. तर तिच्या पतीचा मृतदेह निंभोरासीम येथे झाडाला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मयत पतीचे नाव सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण तर पत्नीचे नाव प्यारीबाई (दोघे रा. बेलखेडा, जि. खरगोन – मध्य प्रदेश) असे आहे. दोन दिवसांपूर्वी दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गळफास आवळून दोघांचा मृत्यू झाल्याचा प्रथमदर्शनी वैद्यकीय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एकाला झालेल्या मारहाण प्रकरणी चौकशीसाठी दोघा मयत दाम्पत्यास मध्य प्रदेशातील धुलकोट पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले होते. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पती- पत्नीत वाद होऊन आधी पत्नीने आणि नंतर पतीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोघांच्या मृत्यूप्रकरणी अनुक्रमे निंभोरा आणि रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे पो. नि. डॉ. विशाल जयस्वाल आणि निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हरदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.