दहा हजाराच्या लाचेत भरकटला पीएसआय 

जळगाव : गुन्ह्यात जप्त केलेले वाहन मुळ मालकास परत देण्याचे न्यायालयाचे आदेश असतांना देखील दहा हजार रुपयांच्या लाचेची अपेक्षा ठेवून ती मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्या पीएसआय ला जळगाव एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. लाचखोर पीएसआय विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास विश्वनाथ ठाकूर असे या लाचखोर पीएसआय चे नाव आहे. ज्या पोलीस स्टेशनला कार्यरत त्याच पोलीस स्टेशनला लाचखोरीचा गुन्हा दाखल होण्याची वेळ पीएसआय कैलास ठाकूर यांच्यावर आली. 

या घटनेतील तक्रारदार हा जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरात राहणारा आहे. त्याचे इर्टीगा वाहन एका गुन्ह्यात निंभोरा पोलीस स्टेशनला जप्त आहे. ते जप्त वाहन सोडवण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने ते वाहन मुळ मालकास परत देण्याचे आदेश दिले. तरी देखील ते वाहन सोडवण्यासाठी निंभोरा पोलीस स्टेशनला कार्यरत पीएसआय कैलास ठाकूर यांनी सुरुवातीला पंधरा हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. मात्र तक्रारदाराला ती रक्कम देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने जळगाव एसीबी कडे धाव घेत तक्रार दाखल केली.

एसीबी पथकाने केलेल्या पडताळणीत पीएसआय कैलास ठाकूर यांनी तडजोडीअंती दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी वाहन मालक तक्रारदारास केली. त्यानुसार सापळा रचण्याची तयारी करण्यात आली. या सापळ्यात पीएसआय कैलास ठाकूर अलगद सापडले.

पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या अधिपत्याखाली सापळा व तपास अधिकारी नेत्रा जाधव यांच्यासह पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, सचिन साठे, हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार, रमेश ठाकूर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here