जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : निसर्गाने मानवासह पशु पक्षी आणि जलचर जीवांना भिन्नलिंगी जीवांचे आकर्षण दिले आहे. या आकर्षणातून भिन्नलिंगी जीवांसोबत लैंगीक संबंध व त्यातून जीवांची उत्पत्ती हा सर्व प्रकार निसर्गाने या भुतलावर केलेली एक किमया आहे. लाज लज्जेच्या चौकटीत राहून लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मानवाने विवाह संस्था निर्माण केली आहे. याचे कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धीचे वरदान दिले आहे. या बुद्धीमुळे मानव लाज लज्जा बाळगून, नातेसंबंध जोपासून, विवाह बंधनात अडकून, समाजमान्य, कायदेशीर मार्गाने, चार भिंतीच्या आड, सर्व प्रकारच्या चौकटीत राहून आपल्या सहचारीणीसोबत संबंध प्रस्थापित करत असतो.
स्त्री ही अल्पाकाळाची पत्नी आणि दिर्घकाळाची माता म्हटली जाते. त्यामुळे संसाराचा गाडा ओढत असतांना, मुलांचे पालणपोषण करतांना स्त्रीची ससेहोलपाट होत असते. त्यामुळे पतीला लैंगिक सुख देण्यात कधी कधी ती मागे पडते. अशा वेळी पतीच्या समजूतदारीची गरज असते. पशू पक्ष्यांचे मात्र तसे नसते. त्यांना कुणाची भिती अथवा दडपण नसते. मनाला येईल तेव्हा पशु पक्षी आपली कामवासना पुर्ण करु शकतात. दोन मुलांची माता असलेल्या एका तरुण विवाहीतेने मद्यपी पतीला सोडून दुस-या पुरुषासोबत राहण्यास सुरुवात केली. मात्र त्या विवाहितेची तिन वर्षाची मुलगी सारखी आईसोबतच रहात होती. तीन वर्षाची मुलगी आईच्या मायेची उब मिळण्यासाठी तिच्यापासून दूर जाण्यास तयारच होत नसे. त्यामुळे ती तिन वर्षाची बालिका आपल्या संबंधात अडथळा असल्याचे मत त्या विवाहीतेसोबत राहणा-या पर पुरुषाने केले. वासनेच्या अधिन झालेल्या त्या चाळीशीतील तरुणाने त्या बालिकेचा काठीने गळा दाबून खून केल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात घडली. वासनेच्या आहारी गेलेला मनुष्य एका बालिकेची देखील कशा प्रकारे निघृण हत्या करु शकतो. कोणत्या थराला जाऊ शकतो हे या घटनेतून दिसून आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे तालुक्याचे ठिकाण बुलढाणा जिल्हा आणि मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवरील गाव आहे. मुक्ताईनगर लगत असलेल्या मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्याच्या वारोली या गावी भारत साहेबराव म्हसाने हा चाळीशीतील युवक राहतो. मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील माधुरी नावाच्या तरुणीसोबत त्याचा सन 2017 मधे विवाह झाला होता. भारत आणि माधुरी यांच्या वैवाहिक जीवनातील प्रेमाचा गोडवा सुरुवातीच्या काळात उसाच्या रसाप्रमाणे राहिला. दोघांच्या संसार वेलीवर दोन फुले उमलली. एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये त्यांच्या संसारवेलीवर फुलली. मुलाचे नाव त्यांनी पियुष आणि मुलीचे नाव आकांक्षा ठेवले. “हम दो हमारे दो” असा चौकोनी सुखी संसाराची त्यांची गाडी पुढे पुढे सरकत होती. प्रेमाचे आणि सुख दुखा:चे एक एक स्टेशन त्यांच्या संसाराच्या प्रवासात येत आणि जात होते. बघता बघता पियुष सहा वर्षाचा आणि आकांक्षा तिन वर्षाची झाली.
बघता बघता भारतला मद्यपानाची सवय जडली. तो कामावरुन परत येतांना मद्यपान करुनच घरी येऊ लागला. त्यामुळे त्याची पत्नी माधुरी त्याच्यासोबत वाद घालू लागली. कधी कधी हा वाद शिगेला जात होता. तळागाळाच्या परिवारातील कर्ता पुरुष ज्यावेळी मद्यपान करुन घरी येतो त्यावेळी वादाच्या घटना या ठरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे जेमतेम उत्पन्न. त्या जेमतेम उत्पन्नातील काही हिस्सा मद्यपानात गेला म्हणजे संसाराचे आर्थिक गणित बिघडते. संसाराचे बजेट बिघडले म्हणजे पत्नी तिच्या पतीसोबत वाद हा घालणारच हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नसते. नेमका हाच प्रकार भारत आणि माधुरी यांच्या संसारात सुरु झाला. भारत मद्यपान करुन घरी येत होता. त्यातून पती पत्नीत वादाची ठिणगी पडत होती. त्यामुळे वैतागून माधुरीने मुलीला कडेवर आणि मुलाला सोबत घेत आपले मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी हे माहेर गाठले. ती दोघा मुलांना घेऊन आता माहेरी राहू लागली. मोलमजुरी करुन दिवस काढू लागली.
ग्रामीण भागात कोण रहायला आले, का आले, किती जण आले, काय घटना घडली याची बातमी पसरण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी कुणा बातमीदाराची अथवा सीसीटीव्हीची गरज नसते. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक महिला ही एक प्रकारे बातमीदार आणि सीसीटीव्हीचेच काम करत असते. माधुरी आपल्या पतीला सोडून मुलांसह राहण्यास आल्याची माहिती बेलसवाडी गावात पसरण्यास अजिबात वेळ लागला नाही. एका महिलेने ही माहिती दुस-या महिलेस आणि दुसरीने तिसरीला दिली. अशा प्रकारे सर्व महिलांना माधुरी आल्याची माहिती समजली.
माधुरी नावाची एक तरुण विवाहिता आपल्या दोन मुलांसह माहेरी बेलसवाडी येथे राहण्यासाठी आल्याची माहिती रावेर येथील अजय घेटे या घटस्फोटीत तरुणाला समजली. अजय घेटे याचा विवाह अगोदर यावल तालुक्यातील मारुळ येथील एका तरुणीसोबत झाला होता. मात्र दोघात बेबनाव झाल्यामुळे दोघे विभक्त झाले. त्यामुळे अजय घेटे हा गेल्या आठ वर्षापासून रावेरला एकटाच रहात होता. आझाद पक्ष्याप्रमाणे तो आपले जीवन जगत होता. पतीला सोडून दोन मुलांसह माधुरी एकटीच रहात असल्याचे समजल्यानंतर आझाद पंछी अजय सरसावला. तिच्यासोबत राहून आपली आझादी नाहीशी करण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला.
अवघ्या विशीत पतीला सोडून राहणारी माधुरी गेल्या पाच वर्षापासून मुलांसह एकटीच रहात होती. ती आता पंचवीस वर्षाची झाली होती. तिच्यापुढे अजून खुप आयुष्य पडलेले होते. गेल्या आठ वर्षापासून रावेरला एकट्या राहणा-या आझाद पंछी अजयने इकडून तिकडून ओळखपाळख काढून माधुरीसोबत परिचय केला. त्याने तिला वागवण्याची तयारी दर्शवली. तिने देखील त्याच्यासोबत राहण्याची तयारी दाखवली. तिच्या सहमतीने तो तिला तिच्या दोघा मुलांसह सोबत घेऊन रावेरला आला. आता दोघे जण दोघा मुलांसह पती पत्नीप्रमाणे रावेरला राहू लागले.
गेल्या पाच वर्षापासून माधुरी पुरुषाच्या सहवासाला आणि स्पर्शाला पारखी झाली होती. मात्र आता तिला अजयचा स्पर्श आणि सहवास लाभला होता. हळू हळू तिला अजयच्या स्पर्शाची सवय जडली. दोघात संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली. दरम्यानच्या कालावधीत माधुरीचा पुर्वाश्रमीचा पती भारत म्हसाने हा तिला पुन्हा आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी तिच्याकडे आला होता. मात्र तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. माधुरी आता रावेरच्या अजय घेटे या तरुणासोबत पत्नीसारखी रहात असल्याचे त्याला समजले. त्यामुळे भारत आल्या पावली माघारी निघून गेला.
आता माधुरीच्या स्पर्शाची चटक लागलेला अजय तिला रात्रंदिवस बाहुपाशात घेण्यासाठी धडपड करु लागला. मात्र मायेची उब मिळवण्यासाठी तिन वर्षाची मुलगी आकांक्षा ही तिची आई माधुरीला सोडण्यास तयार नसायची. स्तनपानासह इतर आवश्यक कामासाठी माधुरी तिची मुलगी आकांक्षाला जवळ घेत असे. उन्हाळ्याचे दिवस आणि पत्र्याची खोली असल्यमुळे तिव्र उकाडा होत असे. त्यामुळे देखील माधुरीची मुलगी आकांक्षा सारखी रडायची. आकांक्षा सारखी सारखी तिची आई माधुरीला चिकटून रहात असल्यामुळे वासनेच्या आहारी गेलेल्या अजयच्या मनाची घालमेल होत असे. आकांक्षा माधुरीपासून केव्हा वेगळी होईल, ती केव्हा झोपी जाईल याची अजय आतुरतेने वाट बघत असे. मात्र आकांक्षा सारखी सारखी रात्री बेरात्री केव्हाही कधीही रडायची. काही दिवसांपुर्वी मोटार सायकल आकांक्षाच्या अंगावर पडली होती. त्यामुळे त्या वेदना तिला असह्य होत असत. त्या वेदनेमुळे देखील बालिका आकांक्षा सारखी रडायची. त्यामुळे माधुरी तिला घेऊनच असायची. याचा अजयला राग येत होता.
तिन वर्षाची बालिका असलेली आकांक्षा आपल्या संबंधात अडसर असल्याची भावना अजयच्या मनात घर करु लागली. तिच्यामुळे आपली वासना पुर्ण होणार नाही असा तो मनाशी विचार करत होता. त्यामुळे आता आकांक्षाला जीवानिशी ठार केले पाहिजे असा कुविचार देखील त्याच्या मनात येऊ लागला. एके दिवशी अजयला कुठेतरी पोलिस बांधव बाळगतात ती फायबरची काठी सापडली. ती काठी त्याने घरात सांभाळून ठेवली.
31 मे 2024 हा तिन वर्षाच्या आकांक्षाच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला. केवळ आईशिवाय या जगाच्या “अबकड” ची देखील ओळख नसलेली बालिका आकांक्षाचा आजचा अखेरचा दिवस नियतीने अजय घेटे याच्या माध्यमातून लिहून ठेवला होता. माधुरीला नेहमी सोबत खिळवून ठेवणारी आकांक्षा आज तिच्या आईपासून कायमची विभक्त होणार होती. तिचे तिच्या आईसोबत जीवनाचे खुप कमी दिवस निसर्गाने लिहून ठेवले होते. त्यामुळेच कदाचीत ती कायम आईच्या उराशी घट्ट चिकटून रहात होती.
या दिवशी सकाळी नऊ वाजेच्या पुर्वी आकांक्षाला घरी ठेऊन माधुरी गावात काही कामानिमीत्त बाहेर गेली होती. आई माधुरी जवळ नसल्यामुळे बालिका आकांक्षा रडू लागली. तिचे रडणे मिनीटागणिक वाढू लागले. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून अजय अस्वस्थ झाला. त्याच्या रागाचा पारा चढू लागला. वास्तविक त्याने तिला कुशीत घेऊन तिचे रडणे थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र नराधम अजयच्या मनात वासनेसह राक्षसी कुविचार भरले होते. कुठेतरी सापडलेल्या पोलिसांच्या फायबर दंड्याने अजयने तिन वर्षाच्या आकांक्षाचा गळा जोरात दाबून धरला. त्यामुळे तिचा नाजुक कंठ तुटण्यास वेळ लागला नाही. चिमुकल्या आकांक्षाने डोळे फिरवून देत कायमचा जीव सोडला. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरला तो आकांक्षाचा सहा वर्ष वयाचा मोठा भाऊ पियुष. आपल्या चिमुकल्या बहिणीचा सावत्र बापाने काठीने गळा दाबून धरल्याचे बघून पियुष मनातून पार घाबरला. त्याने घाबरलेल्या अवस्थेत त्याची दीदी आकांक्षाला उठवण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र निरर्थक, ती केव्हाच देवाघरी गेली होती.
या घटनेनंतर कुणासोबत तरी आकांक्षाला घेऊन अजय बाहेर जाताच माधुरी घरी परतली. पियुषने तिला सर्व हकीकत कथन केली. मात्र बदनामीच्या आणि पोलिस कारवाईच्या धाकाने तिने पियुषला गप्प राहण्यास सांगितले. एक आई देखील आता निष्ठुर झाली होती. अजयने एक रिक्षा आणली. त्या रिक्षाने सर्वजण मयत आकांक्षाला सोबत घेऊन बेलसवाडी येथे मृताची विल्हेवाट लावण्यास निघाले.
सर्वजण मयत आकांक्षाला घेऊन बेलसवाडी येथे पोहोचले. तिन वर्षाची बालिका आकांक्षा मरण पावली असल्याची माहिती संपुर्ण बेलसवाडी गावात पसरण्यास वेळ लागला नाही. या घटनेची माहिती एका सुज्ञ नागरिकाने माधुरीचा पुर्वाश्रमीचा पती भारत म्हसाने याला कळवली. आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती समजताच भारत हा काही नातेवाईकांना सोबत घेऊन बेलसवाडी येथे दाखल झाला.
या ठिकाणी माधुरीसह तिची आई संगिता रमेश खंडारे व गावातील काही महिला घरात बसलेल्या होत्या. मध्यभागी आकांक्षाचा कपड्यात गुंडाळलेला मृतदेह जमीनीवर ठेवलेला होता. आकांक्षाची ग्ळा दाबून हत्या झाल्याची कुणकुण भारतला लागताच त्याचा आणि अजय घेटे याचा जोरदार वाद त्याठिकाणी झाला. संतापाच्या भरात माधुरीचा पहिला पती भारत याने आकांक्षाचा मृतदेह उचलून घेत थेट नजीकच्या अंतुर्ली पोलिस चौकीत आणला. मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने आकांक्षाचा मृतदेह लागलीच मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनकामी नेण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी तिला तपासून मयत घोषित केले. गळा दाबला गेल्याने तिचा कंठ तुटून ती मरण पावल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या घटनेप्रकरणी भारत म्हसाने याने दिलेल्या खबरीनुसार सुरुवातीला मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद 43/2024 या क्रमांकाने सीआरपीसी कलम 174 प्रमाणे घेण्यात आली.
आकांक्षाचा खून रावेर येथे झाल्याचे उघडकीस आल्याने शुन्य क्रमांकाने मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अजय शांताराम घेटे याच्यासह हा गुन्हा लपवून ठेवण्यास सहकार्य करणा-या माधुरी भारत म्हसाने उर्फ (अजय घेटे) या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा शुन्य क्रमांकाने दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा रावेर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला. माधुरीचा पुर्वाश्रमीचा पती भारत साहेबराव म्हसाने याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा भाग 5 गु. र. न. 241/24 भा.द.वि. 302, 201, 34 नुसार दाखल करण्यात आला. दोघा संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना सुरुवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर माधुरीची जळगाव उप -कारागृहात तर अजय घेटे याची नंदुरबार उप – कारागृहात रवानगी करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ व त्यांचे सहकारी हे.कॉ. इश्वर चव्हाण, पो.कॉ. प्रमोद पाटील, समाधान पाटील करत आहेत.