मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी):- भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतिलालजी जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार ११ जून २०२४ रोजी मुंबई येथील ताज लॅण्डस् एंड वांद्रे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यात जे.बी. प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अॅप्रिसिएशन’ने गौरविण्यात आले.
ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम रहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जे.बी. प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ठ कार्य करणाऱ्या (महिला विभाग) श्रीमती शकुंतला कांतिलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे. त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न प्लास्टिक इंडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरवान्वित केले. योगा योगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जे.बी. प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरविण्यात आले. लघु आणि मध्यम उद्योग या विभागांतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगिरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन, वडील कांतिलालजी जैन तसेच कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जे.बी. प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजींग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे