जळगाव : चुलत दिरा सोबत प्रेम संबंध असणाऱ्या विवाहितेने तिच्या पतीचा दिराच्या मदतीने डोक्यात दगड घालून तसेच ब्लेडने वार करून हत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव शिवारात उघडकीस आली आहे. या खूनाचा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने उलगडा केला असून दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता. नादंगाव, जि. नाशिक) असे या मयताचे नाव आहे. वंदना बाळू पवार व तीचा चुलत दिर गजानन राजेंद्र पवार असे अटकेतील दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. बुधवारी उघडकीस आलेल्या या घटनेने चाळीसगाव तालुक्यात खळबळ माजली आहे.
बाळू सिताराम पवार आणि वंदना पवार हे दोघे पती-पत्नी न्यायडोंगरी येथे राहत होते. बाळू यास दारू पिण्याचे व्यसन होते. त्याच्या व्यसनाला वंदना वैतागली होती. दरम्यानच्या कालावधीत तिचे तिचा चुलत दीर गजानन राजेंद्र पवार यांच्यासोबत प्रेम संबंध जुळून आले. गजानन आणि वंदना यांच्या प्रेम संबंधात बाळू पवार हा अडसर ठरत असल्याचे बघून दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.
नियोजित कटानुसार वंदना हिने बाळू यास मंगळवार 18 जून रोजी चाळीसगाव येथे आणले. गजानन याने बाळूला भरपूर दारू पाजली. सायंकाळी वंदना हिने माहेरी कन्नड येथे जायचे आहे असे पती बाळू यास सांगितले. गजानन याने बाळूला त्याच्या दुचाकी वर कोदगाव शिवारात नेले. या ठिकाणी वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार केले. कुणाला संशय येऊ नये म्हणून दोघांनी मिळून त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून त्याचा दारुच्या नशेत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवल्यानंतर दोघे तेथून पसार झाले.
कोदगाव ता. चाळीसगाव येथील रहिवासी तुषार अनिल देसले यांनी 18 जून रोजी रात्री बाळूचा मृतदेह पाहिला. हा अपघाती मृत्यू असल्याचे समजून रात्री अकरा वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. बाळू पवार याच्या अंगावरील खुणांमुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. मयत बाळूच्या नातेवाईकांकडे विचारपूस करण्यात आली. मयताची पत्नी वंदना हिच्याकडे फोनवरुन चौकशी केली असता तिची संशयास्पद उत्तरे ऐकून पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला.
चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातून वंदना व तिचा चुलत दीर गजानन या दोघांना संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेत चौकशी अंती अटक करण्यात आली. दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चौकशी व तपासाअंती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.