विवाहीत वंदना पडली दिर गजाननच्या प्रेमात —– बाळू झाला ठार ब्लेड आणि दगडाच्या घावात

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): “मोहब्बत का रोग जिसे लगे, दो बच्चो की मा भी उसे कुवारी लगे” असे या कलियुगात म्हटले जाते. प्रेम, खरे प्रेम आणि निखळ प्रेम असे गोंडस शब्द ऐकायला, वाचायला आणि बोलायला खुप चांगले वाटतात. प्रत्यक्षात या कलियुगात अनेकांसाठी केवळ शारिरीक आकर्षणाचा हा प्रकार असतो. शारीरीक आकर्षणाची हौस आटोपल्यानंतर वास्तवतेचे चटके बसण्यास सुरुवात झाली म्हणजे आपसात तु तू मै मै चा प्रकार सुरु होतो.

कन्नड येथील वंदना या तरुणीचे लग्न नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील बाळु सिताराम पवार याच्यासोबत सुमारे बारा वर्षापुर्वी झाले होते. लग्नाच्या वेळी वंदना अवघी अठरा वर्षाची म्हणजे एकदम तरुण होती. न्यायडोंगरी गावातील गवळी वाड्यात राहणारा बाळू हा देखील अवघा विस – एकविस वर्षाचा नवतरुण होता. दोघांनी एकमेकांना पाहताच त्यांनी लग्न करण्यास होकार दिला. दोघांचे त्यावेळचे सळसळते तारुण्य विवाहबंधनात कैद झाले. सुरुवातीचा वैवाहीक काळ दोघांसाठी झकास होता.

मात्र काही वर्षांनी बाळूला दारु पिण्याचे व्यसन लागले. कामावरुन घरी परत येण्यापुर्वी त्याचे पाय मधुशाळेच्या अर्थात दारुच्या दुकानाच्या दिशेने वळू लागले. मधुशाळेत शिस्तीत जाणा-या बाळूची घरी येतांना शिस्त बिघडत असे. तो बेशिस्त अवस्थेत झोकांड्या देतच घरी परत येत होता. त्याच्या या वर्तनाला त्याची पत्नी वंदना पार वैतागून जात होती. कधी कधी मद्यधुंद अवस्थेतील बाळूला घरी सोडण्यासाठी त्याचा चुलत भाऊ गजानन राजेंद्र पवार हा येत होता. बाळूला त्याच्या घरी सोडण्यासाठी आलेला गजानन आणि वंदनाची नजरानजर होत असे. मद्यधुंद अवस्थेतील बाळू घरी येताच बडबड करत गाढ झोपून जात असे.

sandip bhatu patil police inspector

तुमच्या भावाच्या दारुच्या व्यसनामुळे मला जीवन नकोसे झाले आहे असे वंदना एकदा तिचा चुलत दिर गजानन पवार यास म्हणाली. त्यावेळी गजाननने मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत धीर दिला. बाळू मद्याच्या आहारी गेला म्हणजे तिचा दिर गजानन हा तिच्या भेटीला येत असे. त्यातून दोघांचा सहवास वाढत गेला. सहवासातून दोघांमधे प्रेमाची कळी खुलण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोघांचे प्रेम बहरण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे बाळूचे मद्यपान वंदना आणि गजाननच्या प्रेमाची दारे उघडण्यास कारणीभूत ठरली.

वंदना आणि गजानन यांच्यातील प्रेमाची खोली एवढी वाढली की त्यांना बाळूची अडचण होऊ लागली. बाळू आपल्या प्रेमात अडथळा होत असल्याची तक्रार वंदनाने तिचा दिर  गजाननकडे केली. तिला आता पती बाळूपेक्षा दिर  गजानन जवळचा वाटत होता. मद्याच्या नशेत बाळूचे बोलणे वंदनाला असह्य होत असे. त्यामुळे त्याला या जगातून कायमचे संपवले तर आपण गजाननसोबत मौजमजेत राहू शकतो असे वंदनाला वाटू लागले. तिने आपल्या मनातील विचार गजाननकडे बोलून दाखवला. गजानन याने तिच्या विचाराला होकार देत सहमती दर्शवली. दोघांनी मिळून बाळूला या जगातून कायमचे बाद करण्याचे ठरवले. त्या दृष्टीने दोघांनी कट आखण्यास सुरुवात केली.

साधारण चार ते पाच महिन्यापुर्वी दोघांनी बाळूला संपवण्याचा कट आखला. त्या पुर्व नियोजीत कटानुसार वंदना आणि बाळू हे पती पत्नी शिर्डी येथे गेले. दि. 18 जून 2024 रोजी शिर्डी येथून चाळीसगावला येणार असल्याची माहिती तिने गजाननला दिली. चाळीसगाव रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिने फोन करुन गजाननला बोलावून घेतले. ठरल्यानुसार गजानन मोटार सायकल घेऊन दोघांना घेण्यासाठी आला. सर्वकाही वंदना आणि गजानन यांच्या कटानुसार सुरु होते. गजाननने दोघांना आपल्या मोटार सायकलवर बसवून घेत भडगाव रस्त्यावरील “हसत  खेळत” या हॉटेलवर आणले. या ठिकाणी गजाननने बाळूला मोठ्या प्रमाणात दारु पाजली.

गजाननकडून फुकटची दारु पिण्यास मिळत असल्याचे बघून मद्याचा शौकीन असलेल्या बाळूने पिण्याचा सपाटा सुरु केला. नेमके हेच गजानन आणि वंदना या दोघांना हवे  होते. दोघांच्या पुर्वनियोजीत कटानुसार सर्व घटनाक्रम सुरु होता. बाळूने यथेच्छ दारु पिल्यानंतर तिघांनी जेवण केले. या सर्व घटनाक्रमात रात्रीचा अंधार पडण्यास सुरुवात झाली. रात्रीच्या अंधाराचा गैर फायदा घेत वंदनाने ठरल्यानुसार “आता मला माझ्या माहेरी कन्नडला जायचे आहे” असा हेका मुद्दाम सुरु केला. बाळूने मोठ्या प्रमाणात मद्यपान केले असल्यामुळे त्याला काहीही सुचत नव्हते. मात्र कन्नडला जाण्याच्या बहाण्याने त्याला रस्त्यावर नेऊन ठार करण्याचे दोघांचे नियोजन होते.

कन्नडला जाण्याच्या बहाण्याने तिघे ट्रिपलसिट मोटारसायकलने निघाले. गजानन राजेंद्र पवार याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल हिरापूर रोडने खडकी बायपास व तेथून कन्नड रोडने कोदगाव शिवारात नेली. याठिकाणी तिघेजण रस्त्याच्या खाली उतरले. वंदनाचा पती बाळूने बेतापेक्षा अधिक मद्यप्राशन केल्यामुळे त्याला काहीही सुचत नव्हते. आता बाळूचे मरण जवळ आले होते. आपली मृत्यूची घटीका समीप आल्याचे मद्याच्या नशेतील बाळूला काय समजणार होते.

ठरलेल्या कटानुसार वंदनाने तिच्या जवळ असलेल्या सॅकमधून जुने ब्लेड बाहेर काढले. त्या ब्लेडचे पाते तिने पती बाळूच्या पोटावर मारले. ब्लेडच्या धारदार पात्याचे वार बाळूच्या पोटावर होताच बाळू तळमळत खाली कोसळला. बाळू जमीनीवर तळमळत असतांना जवळच पडलेला एक सुमारे 25 ते 30 किलो वजनाचा दगड गजानन याने उचलला. तो वजनदार दगड उचलून गजाननने बाळूच्या चेह-यावर आपटला. आधी ब्लेडचे पोटावर वार नंतर दगडाचे चेह-यावर घाव बसल्याने बाळू अजूनच मोठमोठ्याने तळमळू लागला. गंभीर जखमी झालेल्या बाळूने निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात आपले प्राण सोडले. अशा प्रकारे मद्यपी बाळूचा करुण अंत झाला.  

बाळू पवार हा काहीही हालचाल करत नसल्याचे बघून आपले काम फत्ते झाल्याचे समाधान दोघांच्या चेह-यावर उमटले. आता आपल्यावर कुणीही संशय घेऊ नये  यासाठी त्याच्या अपघाती मृत्यूचा देखावा करण्यास दोघांनी सुरुवात केली. बाळू पवार याचा मद्याच्या नशेत अपघात झाला आहे असे दाखवण्यासाठी दोघांनी त्याचा मृतदेह ओढत ओढत महामार्गावर आणून टाकला.  त्याची ओळख पटावी म्हणून वंदनाने आठवणीने आणलेले त्याचे आधार कार्ड तिच्या ताब्यातील सॅकमधून बाहेर काढले. ते आधार कार्ड त्याची ओळख  पटण्यासाठी त्याच्या शर्टाच्या खिशात न चुकता ठेवण्यात आले. त्यानंतर गजानन याने मोटार सायकलने वंदनाला चाळीसगाव रेल्वे स्टेशनला सोडून तो एकटाच न्यायडोंगरी येथे निघून आला. आता आपल्यावर कुणीही शंका घेणार नाही अशा अविर्भावात दोघे एकटेच आपल्या आपल्या घरी वेगवेगळ्या साधनांनी व मार्गाने जाण्यास निघाले. रात्रभर बाळूचा मृतदेह तसाच अंधारात पडून राहिला.

दुस-या दिवशी 19 जून 2024 रोजी बाळूचा मृतदेह गावक-यांच्या नजरेस पडला. हा अपघाती मृत्यू असल्याचा समज लोकांचा झाला. या घटनेप्रकरणी तुषार अनिल देसले या कोदगाव येथील सुज्ञ नागरिकाने चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला बाळू सिताराम पवार यास कोणत्यातरी वाहनाने धडक दिल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला असावा अशी खबर दिली. त्याच्या खिशातील आधार कार्डामुळे त्याची ओळख  पटली होती.  त्या खबरीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. सीआरपीसी 174 नुसार 61/24 या क्रमांकाने ही नोंद घेण्यात आली. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पो. नि. संदीप भटू पाटील यांनी आपल्या सहका-यांसह भेट देत पुढील कारवाईसह तपासाला सुरुवात केली.

घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यातून मिळालेल्या कपड्यावरील रक्ताचा नमुना, दगडावरील रक्ताचे नमुने, रस्त्यालगत असलेली रक्तमिश्रीत माती, जवळच पडलेल्या रुमालावरील रक्ताच्या डागाचे नमुने, जमीनीवर मिळालेले ब्लेड आदी वस्तू तपासकामी ताब्यात घेण्यात आल्या. घटनास्थळावरील परीस्थीतीचे बारकाईने निरीक्षण केले असता मयतास कुणीतरी दगडाने ठेचून, ब्लेडने दुखापत करुन जीवे ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. मयताच्या आधारकार्डावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या नातेवाईकांचा न्यायडोंगरी दुरक्षेत्राच्या संबंधीत पोलिस अंमलदारांच्या मदतीने शोध  घेण्यात आला. व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून मयताच्या नातेवाईकांना मयताचे फोटो पाठवण्यात आले. ते फोटो बघून मयत इसम हा बाळू पवार हाच असल्याचे खात्री पटली. त्यामुळे पुढील तपासकामी मदतीसाठी मयताच्या नातेवाईकांना पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. मयत बाळू हा त्याची पत्नी वंदनासह शिर्डी येथे कामासाठी गेला होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांना समजली.

त्या माहितीच्या आधारे वंदना हिचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात आला. तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. ती स्वतः शिर्डी येथे असल्याचे तसेच बाळू हा न्यायडोंगरी येथे गेला असल्याचे सांगून तिने पटकन तिचा मोबाईल फोन बंद केला. तिचे बोलणे व तिचे पटकन मोबाईल बंद करण्याचा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यामुळे तिचे मोबाईल लोकेशन घेतले असता ती चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची तांत्रीक माहिती मिळाली.  त्यामुळे तिच्यावरील संशय अजूनच बळावला.

पो.नि. संदीप भटू  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने वंदना बाळू पवार हिला चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले गेले. तिला तिच्या पतीची माहिती विचारली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिला पोलिस कर्मचा-याच्या समक्ष व मदतीने तिची सखोल चौकशी करण्यात आली. याशिवाय मयत बाळूचे वडील सिताराम बबन पवार तसेच इतर  काही नातेवाईकांना देखील पोलिस स्टेशनला चौकशीकामी बोलावण्यात आले.

सखोल चौकशीअंती वंदना पवार हिचे खोटे बोलणे फार वेळ  तग धरु  शकले नाही. अखेर तिने सत्य कथन करण्यास सुरुवात केली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तिचा चुलत दिर गजानन पवार याला देखील न्यायडोंगरी येथून ताब्यात घेण्यात आले. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला वंदना हिला बघताच त्याच्या मनात भिती निर्माण झाली. वंदना हिने आम्हाला सर्व काही खरे  सांगितले आहे, तु देखील खरे  काय ते आम्हाला सांग असा त्याला दम देण्यात आला. गजानन पवार हा देखील फार वेळ खोटे बोलू शकला नाही. त्याने तसेच वंदना हिने दिलेली माहिती मिळतीजुळती असल्याचे दिसून आले. मद्यपी बाळूची पत्नी वंदना व तिचा दिर गजानन पवार यांच्यात प्रेमाचे संबंध होते. या संबंधात बाळूचा अडसर दोघांना सुरु होता. त्यामुळे दोघांनी मिळून बाळूचा जीव  घेतला. वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडचे तर गजानन पवार याने चेह-यावर दगडाचे वार केले होते. या घटनेप्रकरणी सरकारतर्फे सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी फिर्याद दिली. भाग 5 गु.र.न. 266/24  भा.द.वि. 302,201, 120 (ब), 34 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा संशयीतांना अटक करण्यात आली.

या गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदिप पाटील व त्यांचे सहकारी हे.कॉ. विनोद भोई करत आहेत. त्यांना स.पो.नि. सागर ढिकले, पोलिस उप निरीक्षक सुहास आव्हाड, पोउनि संदिप घुगे, पोउनि सुभाष पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, योगेश बेलदार, पंढरीनाथ पवार, प्रवीण जाधव, अजय पाटील, पोना महेंद्र पाटील, भुषण पाटील, दिपक पाटील, रवींद्र पाटील, तुकाराम चव्हाण, पोकॉ प्रकाश पाटील, शरद पाटील, नंदकुमार महाजन, विजय पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, राकेश  महाजन, गोपाल पाटील, अमोल पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, ज्ञानेश्वर पाटोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सुधाकर अंभोरे, पोना लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, महेश सोमवंशी तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोकॉ गौरव पाटील, मिलींद जाधव, फॉरेन्सीक टीमचे पोकॉ हरिष परदेशी, शिवराज नाईक, प्रमोद ठाकूर आदींचे सहकार्य लाभले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here