मुलीचा शाळेत विनयभंग – शिक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या आईने व्याजाची रक्कम न दिल्याने शाळेतील शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या विद्यार्थिनीसह तिच्या बहिणीला मारून टाकण्याची देखील धमकी देखील देण्यात आली. 12 ते 18 जून या कालावधीत घडलेल्या या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला शिक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृह उद्योग करणाऱ्या एका महिलेने व्यवसाय वाढीसाठी सुवर्णा रामकृष्ण पाटील (रा. खोटेनगर) व वंदना अजय पाटील (रा. श्रद्धा कॉलनी) यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. या रकमेच्या बदल्यात आतापर्यंत सहा लाख रुपये दिल्याची महिलेचे म्हणणे आहे. 1 लाख 40 हजार रुपये बाकी असताना 12 जून रोजी सुवर्णा पाटीलसह तिचा पती रामकृष्ण देवराम पाटील, वंदना पाटील व तिचा पती तथा शिक्षक अजय पाटील चौघेजण महिलेच्या घरी आले. त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन केले.

18 जून रोजी या महिलेची चौदा वर्षांची मुलगी शाळेत गेली होती. त्यावेळी शिक्षक अजय पाटील याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी विद्यार्थिनीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा पाटील, रामकृष्ण पाटील, अजय पाटील, वंदना पाटील यांच्याविरुद्ध कलम 354, पोक्सो अधिनियम कलम 7, 12, 17, 18 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि राजेंद्र उगले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here