एके 47 ची जिवंत काडतुसे बाळगणा-या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील उपअभियत्यास एके 47 या रायफल मध्ये वापरल्या जाणा-या जिवंत काडतुसासह रंगेहात पकडण्यात आले आहे. सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार वेळीच आल्यामुळे पुढील कारवाई करण्यात आली. सतीश जयसिंग इंगळे असे या उपअभियंत्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध फॅक्टरी प्रशासनाच्या वतीने वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.

सतीश जयसिंग इंगळे हा उपअभियंता बुधवारी दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी फॅक्टरीच्या बाहेर जात असतांना त्याच्या दुचाकीच्या (एमएच 19 एटी 1504) हेडलाइटच्या कव्हर खाली पाच जिवंत काडतुसे सुरक्षा रक्षकास आढळून आली. हा प्रकार लागलेत सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांना कळवण्यात आला. 

वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्या स्टाफ सह घटनास्थळ गाठले. उपअभियंत्याकडे आढळून आलेली जिवंत काडतुसे एके 47 या रायफलमध्ये वापरली जातात. उप अभियंता सतीश इंगळे यांच्याविरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनला शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here