शिपायाने भरवली हेडमास्तरची शाळा — एसीबी कारवाईत आल्या त्याला कळा

जळगाव : शाळेच्या शिपायाकडून दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या हेडमास्तरला जळगाव एसीबी पथकाने रंगेहात ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप प्रभाकर महाजन असे निपाने ता.एरंडोल येथील संत हरिहर माध्यमिक हायस्कूल येथील या लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदार हा शिपाई म्हणून या शैक्षणिक संस्थेत कामाला आहे. त्याच्या मागील प्रलंबित वेतन निश्चितीच्या फरकाची रक्कम 2,53,670/-रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्या कडे पाठवण्यात आला होता. या प्रस्ताव मंजुरीचे काम मुख्याध्यापक संदीप महाजन याने स्वतः च्या ओळखीने करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणुन मंजुर रकमेच्या 5% प्रमाणे 12,500/-रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक संदीप महाजन याने शिपायाकडे केली होती. 

शिपायाने याबाबत 25 जून 2024 रोजी जळगाव एसीबी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. पंचांग समक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत वेतन निश्चितीच्या 2,53,780 रुपयांचे 5 टक्क्यांप्रमाणे 12,500/-रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर दिनांक 27 जून 2024 रोजी संस्थेच्या मुख्याध्यापक कार्यालयात दहा हजार रुपयांची लाख घेताना मुख्याध्यापक संदीप महाजन यास रंगेहात पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्यासह सापळा पथकातील  पीएसआय दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here