जळगाव : शेअर मार्केट क्लासच्या माध्यमातून विविध आमिषाला बळी पडलेल्या जळगावच्या व्यापा-याची 5 लाख 95 हजार 750 रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यापा-याने सायबर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोघांना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. हेमेंद्र राजेंद्र शर्मा असे फसवणूक झालेल्या व्यापा-याचे नाव आहे.
जळगाव येथे जय नगर परिसरात हेमेंद्र शर्मा हे व्यापारी राहतात. त्यांना शेअर मार्केटमधे रक्कम गुंतवण्यासाठी माहिती हवी होती. दरम्यान फेसबुकवर एक जाहिरात त्यांच्या वाचनात आली. राम इनव्हेस्टमेंट अकॅडमी नावाने ती जाहिरात होती. त्या जाहिरातीमधे इनव्हेस्टमेंट बाबत मोफत माहिती दिली जाणार असल्याचा उल्लेख होता. याशिवाय त्या जाहिरातीमधे एक लिंक देण्यात आली होती.
त्या लिंकवर शर्मा यांनी क्लिक केले असता ते एका व्हाटसअॅप गृपला जॉईन झाले. RAM INVESTMENT ACADEMY Z1 या नावाने तो व्हाटस अॅप गृप होता. त्यात गृप मधे गुरुराम (मो.क्रं. 6580594532) आणि दिया (मो.क्रं. 6589250843) असे दोघे जण अँडमीन होते. त्या व्हॉटसअँप गृपला एक लिंक शेअर करण्यात आली होती. या लिंकवर गेल्यानंतर आमिष दाखवून फसवणूकीचे फंडे होते.
त्यामध्ये शेअर मार्केट संबधीत क्लास डॉ. अशिंद शहा आणि गुरुराम यांच्यामार्फत सुरु होते. त्या व्हॉटसअॅप गृप वरुन शहा आणि गुरुराम यांनी लवकरच मुंबई येथे शेअर मार्केट संबधीत ऑफीस सुरु करणार असल्याचे नमुद केले होते. किमान 500 लोकांना यातून काम देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी वेगवेगळे कारण सांगून प्रलोभन देण्याचे काम सुरु होते. जो कुणी हा क्लास दहा वेळा अटेन्ड करेल त्याला एक हजार रुपये, विस वेळा क्लास अटेंड करणा-यास मोबाईल व चाळीस वेळा क्लास अटेंड करणा-यास लॅपटॉप देण्याचे प्रलोभन देण्यात आले होते. त्यानंतर विविध माध्यमातून शेअर खरेदी विक्रीचे प्रशिक्षण घेण्यासाठी एक अँप जॉइन करण्यास देखील सांगण्यात्त आले. व्यापारी हेमेंद्र शर्मा यांना विविध कारणे सांगून त्यांच्याकडून एकुण 5 लाख 95 हजार 750 रुपये विविध बँक खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आली. ती रक्कम शर्मा यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर जमा देखील केली.
ज्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली होती त्या खाते क्रमांकाच्या केवायसी कागदपत्रांमध्ये असलेल्या UDYAM REGISTRATION CERTIFICATE मध्ये एक मोबाईल क्रमांक रजिस्टर असल्याचे पोलिस तपासात दिसून आला. त्याचा आधार घेत तांत्रीक तपासाच्या मदतीने वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ वसंत साहेबराव बेलदार, पोना प्रदिप चौधरी, पोका श्रीकांत चव्हाण, पोकॉ ललित नारखेडे, नितीन भालेराव, पो.हे.कॉ. प्रशांत साळी यांचा या पथकात समावेश करण्यात आला.
दि. 24/06/2024 ते 25/06/2024 या कालावधी दरम्यान दिल्ली येथे जावून कॉल डीटेल्सच्या माहितीवरुन सापळा रचण्यात आला. पोलिस पथकाने पटेल नगर, दिल्ली परिसरातून रणजित सिंग पिता- मदन कुमार (रा. जे ब्लॉक 327, जहांगीरपुर, दिल्ली) व प्रविण कुमार शाही पिता- बिरेंद्र शाही, (रा. प्लॉट नं 85/86, चौथा मजला, अंबरहाय एक्सटेंशन, व्दारका सेक्टर-19, दक्षिण- दिल्ली 110075) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातुन पंजाब नॅशनल बँकेच्या केवायसी कागदपत्रांमध्ये दिलेल्या उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटला लिंक असलेला मोबाईल फोन, एकुण विविध बँकांचे एटीएम कार्ड ताब्यात घेऊन त्यंना 25 जून 2024 रोजी अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलिस स्टेशनचे पो.नि. दत्तात्रय निकम व त्यांचे सहकारी करत आहेत.