लोकसभा निवडणुकीत चारशे पारच्या ढगांचा गडगडाट गाजला. महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात मात्र जोरदार दणका बसल्याने आता महाराष्ट्रात मात्र कुरघोडीचे राजकारण रंगतेय. खास करून भाजपात घमासान दिसते. 45 पारच्या महत्त्वाकांक्षांची गर्जना करणारी भाजपा जमिनीवर आली. या दारुण पराभवाचे खापर कोणी कोणाच्या डोक्यावर फोडावे हे जाहीर होण्याच्या आतच निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वीच तत्कालीन पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा आम्ही सशक्त असून आरएसएसची गरज नाही असा पहिला बॉम्ब टाकला होताच. त्यामुळे “मी पराभवाची जबाबदारी घेतो, सरकार मधून मुक्त करा” या देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीने काही काळ खळबळ माजली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी देखील पद सोडावे यासाठी फडणवीस नावाचा ट्रॅप लावला गेला असेही बोलले गेले. संघप्रमुख विरुद्ध दिल्ली प्रमुख असा संघर्ष पेटला काय? असेही म्हणून झाले. देशात आणि राज्यात कोण किती सशक्त अशीही चर्चा रंगली. भाजपातून संघावर प्रहार झाल्यावर भांबावलेला परिवार काही क्षण मौनात गेला. लागलीच काही तासात संघाच्या अधिकृत मुखपत्रातून भाजपच्या सत्तेत अजितदादा गटाला घेतल्याने हे घडल्याचे नरेटिव्ह जोमात चालवण्यात आले. सोशल मीडियावरून राज्याच्या केंद्राच्या सत्तेतली ‘दादागिरी’ संपवा या मागणीने जोर धरला.
महाराष्ट्रात भाजपच्या या दारुण पराभवाचे खापर दादा गटावर फोडण्याची चतुराई संघनिष्ठ स्वयंसेवकाच्या मुखकमलाद्वारे करुन संघाने फडणवीसांना अलगद वाचवण्याचा पवित्रा घेतला. चाणाक्षणी डावपेच हेरले. लागलीच संघ विरुद्ध मोदी- शहा हा दिसणारा संघर्ष खरा आहे काय? हे दिखाऊ भांडण खरे मानायचे काय? भाजपच्या पराभवाचा ठिकरा नेमका कुणाच्या माथी फोडायचा? कुणाची मान अडकवायची? सोडवायची? यशाचे बाप अनेक, पराभवाचे कोणी नाही. मग दोष तो कुणाचा? महाराष्ट्र नेत्यांचा? दिल्लीचा? तिकीट वाटपात हुकूमशाही करणारांचा? राज्याच्या नेत्यांना न जुमानणाऱ्यांचा? 400 पारचा “अश्वमेध” सोशल मीडियावर चौखूर उधळल्याचे गाजवणाऱ्या पाळीव तैनाती फौजांचा? दिल्या घेतल्या शिदोरीवर एकाच नेत्याची टिम टिम वाजवणा-यांचा? दिल्लीचे घबाड मनमानीपणे फस्त करु पाहणाऱ्या मीडिया सेलचा? सुमारे साडेपाचशे कोटीचे घबाड भलत्यांनाच वाटल्याची बोंबाबोंब करणाऱ्या “चोर मचाए शोर” वाल्यांचा? अशा अनेक प्रश्नांच्या फैरी चर्चेत आल्या.
त्यातच मीडिया सेल प्रमुखाने शेकडो कोटीचा भंडाफोड करणाऱ्या वयोवृद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांना पाठवलेली नुकसान भरपाईची नोटीस देणे आणि ती गृहमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने मागे घेण्याचे प्रकरण गाजले. नोटीस मागे घेतली तरी ती पाठवण्यामागे कुणाचा हात? ज्याच्या सांगण्यावरून नोटीस दिली त्याच्याच सांगण्यावरून माघार झाली का? नोटीस द्यायला लावणाराही तोच, मदतीस धावून येणाराही तोच असे प्रश्न उठवत सन्माननीय भाऊंची शिकार करण्याचा प्रयत्न झाला काय? त्याचा डॉ. निरडगुडकर होता होता राहिला. अशी अनेक उप कथानके सोशल मीडियावर गाजली. हे सारे होत असतानाच सोशल मीडियावर एक भली मोठी फौज सन्माननीय देवेंद्र फडणवीस हेच कसे चतुर चाणाक्ष नेते आहेत हे गळ्याच्या शिरा ताणून सांगताना दिसतेय. महाराष्ट्रात उद्याच्या विधानसभा निवडणुका जिंकून देण्यासाठी फडणवीसांशिवाय दुसरा कोणी पर्यायी नेता दिसत नाही हे लक्षात आल्याने भाजपात त्याच कुण्या स्पर्धक हितशत्रूंनी छुप्या हालचाली करुन फडणवीसांवर हल्ला केल्याचे नरेटीव्ह जोर जोरात पुढे रेटले जात आहे.
कथित नोटीस प्रकरणातल्या प्रमुख पात्र असलेल्या कथित महत्वाकांक्षी दिव्या स्पंदन व्यक्तिमत्वाला राज्य विधानसभेवर जाण्याची घाई झाल्याचे या भांडणातून बाहेर आले. भाजपाच्या राज्यातील पराभवाच्या समुद्रमंथनातून बाहेर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे असल्या निवडणुकांच्या इच्छित हेतूपूर्तीसाठी उपयुक्त प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियात देखील काहींना कायम “एकादशीच्या घरी शिवरात्रीचा निर्जली उपवास” घडवून पाहिला. नैवेद्य देवाला आणि देवाजवळच 24 तास बसणाऱ्याला ठराविक कंपूला दिला जात असल्याचे बाहेर आले. जे लोकसभेत आले ते विधानसभा निवडणुकीत घडू नये म्हणून भाजपात सध्या जोरात ब्लेमगेम दिसतो. सत्तातुरांच्या टोळ्या प्रत्येक जिल्ह्यात भिडलेल्या दिसतील. बजेट मधील बरसात आणि खिरापतीची शिदोरी मतदारांना सांगितली जाईल. मात्र या टोळी युद्धात भरडल्या जाणाऱ्यांचे काय होणार?