जळगाव : अट्टल घरफोडी करणा-या आरोपीस भडगाव पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वर्धा येथून जेरबंद केले आहे. घरफोडीतील 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने छत्तीसगड राज्याच्या रायपूर येथून हस्तगत करण्यात देखील पोलिस पथकाला यश आले आहे. प्रशांत काशिनाथ करोशी असे अटक करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील मौजे इस्पुर्ली येथील अट्टल घरफोड्याचे नाव आहे.
भडगाव येथील विद्यानगर परिसरातील रहिवासी प्रकाश भोसले यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून घरफोडीचा प्रकार 12 डिसेंबर 2023 रोजी घडला होता. या घटनेत बेडरुममधील कपाटाचे कुलुप तोडून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 10 लाख 86 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे यांच्याकडे देण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपी प्रशांत करोशी यास वर्धा येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने चोरी केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांपैकी 120 ग्रॅम वजनाचे 8 लाख 64 हजार रुपये किमतीचे सोने छत्तीसगड राज्यातील रायपुर येथून हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ. किरण रवींद्र पाटील, पो.कॉ. प्रवीण कडू परदेशी, पोकॉ. संदिप सोनवणे यांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. या गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे करत आहेत.