दोघांचे गळे कापून सुपारी हत्या झाली सुरतला — दोघे फरार आरोपी जेरबंद झाले जळगावला!!

जळगाव/सुरत (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्ता गुंड प्रवृत्तीचा असला तरी त्याचे समाजात एक वलय असते. ते वलय त्यांना जपायचे असते. राजकीय आणि सामाजिक वलय जपतांना पदाधिका-यांना सामाजिक भान ठेवावे लागते. हे वलय जपण्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे हथकंडे वापरावे लागतात. चार चौघात कुणी आपला अपमान केला अथवा धमकी दिली तर अशा पदाधिकारी व्यक्तीची प्रतिमा मलीन होते आणि त्यांचे चारित्रहणन होत असते. अशा घटनेतून समाजात एक वेगळा संदेश देखील जातो. आपल्याला चारचौघात कुणी धमकी दिली अथवा अपमान केला तर अशा पदाधिका-यांचा अहंभाव दुखावला जातो. आपला अपमान करणा-या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे नेते कोणत्याही थराला जातात.

खुर्शिद मुनावर अली सैय्यद हे गुजरातच्या सुरत येथील ऑल इंडीया एमआयएम या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. साहजीकच त्यांचा सुरत येथील मुस्लिम समुदायामधे एक रुतबा होता. एखादी व्यक्ती बड्या पदावर गेली म्हणजे त्याचे शत्रुदेखील तयार होत असतात. एमआयएम संघटनेचे माजी अध्यक्ष खुर्शिद सैय्यद यांचा लिंबायत येथे चहाचे दुकान चालवणा-या बिलाल सैय्यद याच्यासोबत काही वर्षापुर्वी वाद झाला होता. दोघांमधील वादाची परिणीती एका सार्वजनिक जागी मारहाणीत झाली होती. चार चौघात बिलाल सैय्यद व त्याचा साथीदार अझहर कादीर शेख या दोघांनी खुर्शीद सैय्यद यास शिवीगाळ करत मारहाण केली होती. याशिवाय खुर्शिद सैय्यद यांचा जावई असलम यास जीवे ठार करण्याची धमकी दिली होती असे म्हटले जाते. हा वाद लिंबायत पोलिस स्टेशपर्यंत गेला होता. लिंबायत पोलिस स्टेशनला एमआयएम संघटनेचे माजी अध्यक्ष खुर्शिद मुनावर अली सैय्यद यांनी बिलालसह त्याचा साथीदार अझहर अशा दोघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला होता. बिलाल यास त्यावेळी अटक करण्यात आली. त्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता. तेव्हापासून खुर्शिद आणि बिलाल यांच्यातील वाद धुमसत होता. सुटका झाल्यानंतरही बिलालने खुर्शिद यांना अपमानित करण्यासह त्रास देण्याचे काम सुरुच ठेवले असे म्हटले जाते.

मोहम्मद असलम शेख हा खुर्शिद यांचा जावई आहे. अफजल अब्दुल शेख हा असलमचा भाऊ आहे. बिलाल कडून होणा-या  त्रासाची व्यथा खुर्शिद यांनी जावई असलम यास कथन केली. त्यामुळे त्याचा गेम करण्याची कल्पना खुर्शिद यांनी जावई असलम याच्याकडे मांडली. याकामी असलम याने त्याचा भाऊ अफजल याची मदत घेण्याचे ठरवले. अफजल हा बिलालचा मित्र असल्यामुळे त्या मैत्रीच्या आडून त्याचा गेम करण्याचे निश्चित झाले.

बिलाल यास ठार करण्यासाठी खुर्शिद याने जावई असलम यास सोळा लाख रुपयांची सुपारी दिली. याकामी असलम याने त्याचा भाऊ अफजल यास सामिल करुन घेतले. साधारण एक वर्षापुर्वी खुर्शिद आणि बिलाल यांच्यातील धुमसणा-या वादाची परिणीती सुपारी हत्येच्या माध्यमातून बदला घेण्यापर्यंत गेली. बिलाल याच्या हत्येचा कट सहा महिन्यापुर्वी शिजला. त्याच्या हत्येसाठी ठरलेल्या सोळा लाखापैकी बारा लाख अगोदरच देण्यात आले होते.

या कटाचा भाग म्हणून अफजलने बिलाल आणि त्याचा साथीदार अझहर या दोघांसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. 8 जून 2024 रोजी अफझलने सुरत नजीक असलेल्या उचामल या गावी बिलाल यास काही कामानिमित्त बोलावले. वास्तविक तो बिलाल यास जीवानिशी संपवण्याचा अफझलचा कट होता. यावेळी अफझलसोबत त्याचे साथीदार कौशिक वसावा आणि प्रज्ञेश गामीत हे देखील होते. मात्र यावेळी बिलाल एकटा न येता त्याच्यासोबत त्याचा साथीदार अझहर हा देखील आला. त्यामुळे तिघे विचारात पडले.

Hitesh joisar DSP surat rural

यावेळी संधी साधत अफझलने त्याचे साथीदार कौशिक वसावा आणि प्रज्ञेश गामीत यांच्या मदतीने बिलालची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर या घटनेचा साक्षीदार अझहर याने या खूनाची माहिती जगासमोर आणली तर आपण अडचणीत येऊ असा विचार अफझल यास सतावू लागला. त्यामुळे अझहर याची देखील गळा चिरुन हत्या करण्यात आली. दोघांची हत्या तर केली मात्र त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न अझहर व त्याच्या साथीदारांपुढे होता.

अफजलसह त्याच्या दोघा साथीदारांनी अझहर आणि बिलाल या दोघांचे मृतदेह रात्रीच  उचावण गावातील कब्रस्थानात कारने नेले. मात्र कब्रस्थानाच्या प्रवेशद्वाराला कुलूप होते. त्यामुळे त्यांनी स्मशानभुमीचे कुंपन तोडून दोन्ही मृतदेह आत नेले. रातोरात त्याठिकाणी दोन खड्डे खणून दोघांचे मृतदेह त्यात दफन करण्यात आले. सुरत शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या कब्रस्थान केअरटेकरच्या नजरेस हे दोन्ही खड्डे दुस-या दिवशी सकाळी नजरेस पडले. नवीन व ताज्या कबरी पाहून कब्रस्थानच्या काळजीवाहकाने गावच्या सरपंचांना याबाबत माहिती दिली. गावात एकही माणूस मरण  पावला नसतांना ही नवी कबर कुणी खोदली हा नवा प्रश्न निर्माण झाला.

उमरपाडा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सक्षम महसुल अधिका-यांच्या उपस्थितीत दोन्ही कबरी खोदण्यात आल्या. बघता बघता मातीच्या ढिगा-यातून गळा चिरलेले दोन संशयास्पद मृतदेह बाहेर निघाले. दोघा मृतदेहांना पोस्टमॉर्टमकामी रुग्णालयात रवाना करण्यात आले. दोघा मृतदेहांची हत्या करण्यात आल्याचा वैद्यकीय अहवाल उमरापाडा पोलिसांच्या हाती आला.

अधिक तपासाअंती दोघे मृतदेह सुरत शहराच्या लिंबायत भागातील रहिवासी असलेले अझहर कादिर शेख आणि बिलाल सय्यद यांचे असल्याचे निष्पन्न झाले. दोघा मृतदेहांची ओळख  पटल्यानंतर त्याबाबतची माहिती दोघांच्या नातेवाईकांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी तातडीने उमरपाडा पोलीस स्टेशन गाठले. या घटनेप्रकरणी मयत बिलाल सय्यद याचा भाऊ कादीर सय्यद याने उमरपाडा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीच्या आधारे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

8 जून 2024 रोजी सायंकाळी बिलाल हा घरातून कुणाला काही न सांगता बाहेर गेला होता.  गेल्या दोन दिवसांपासून बिलाल हा घरी  परत  आला नव्हता. त्यामुळे लिंबायत पोलिस स्टेशनला तो हरवल्याबाबत मिसींग दाखल करण्यात आली होती. त्याच दिवसापासून अझहर हा देखील घरी आला नव्हता. अधिक पोलिस तपासाअंती मयत  बिलालचे अफजल नावाच्या तरुणासोबत भांडण झाले असल्याची बाब समोर आली.

सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि इतर पुरक पुराव्याच्या आधारे पुढील तपासाला गती  देण्यात आली. सुरत ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक हितेश जोईसर यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी बी. के. वनार यांच्या नेतृत्वाखाली आरोपींच्या अटकेसाठी दहा पथके तयार करण्यात आली. तपासाची चक्रे गतीमान करत  एमआयएम संघटनेचे माजी अध्यक्ष खुर्शीद सैय्यद, त्याचा जावई असलम शेख आणि कौशिक वसावा अशा तिघांना शिताफीने अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरात राज्यातून फरार झालेल्या अफजल शेख (खुर्शिदच्या जावयाचा मोठा भाऊ) आणि प्रज्ञेश गामीत अशा दोघांची नावे उघडकीस आली.

अफजल शेख आणि प्रज्ञेश गामीत या दोघांचे लोकेशन घेतले असता ते महाराष्ट्रातील जळगाव येथे असल्याचे उघड झाले. सुरत ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधिक्षक हितेश जोईसर यांनी तातडीने जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून दोघा तरुणांचे गळे कापून केलेल्या हत्या प्रकरणातील दोघा फरार आरोपींच्या अटकेसाठी मदतीची मागणी केली. डॉ. रेड्डी यांनी तातडीने एलसीबी पथकास दोघा फरार आरोपींना ताब्यात घेण्याची सुचना केली. त्यानुसार जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून अफजल अब्दुल शेख (रा. उमरपाडा सुरत) आणि प्रज्ञेश दिलीप गामीत (तरकुवा डुंगरी फलिया जि. तापी गुजरात) या दोघांना सापळा रचून पकडण्यात आले. दोघे ट्रकमधे बसून पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान सुरत पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होतेच. अटकेतील दोघांना सुरत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांनी खुनाची कबुली दिली. यातील अफजल अब्दुल शेख याच्यावर गुजरात राज्यात खुनाचे पाच गुन्हे दाखल असून प्रज्ञेश गामीत याच्यावर वेगवेगळे गंभीर स्वरुपाचे पंधरा गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here